Tuesday, January 6, 2026
HomeनगरSangamner : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी

Sangamner : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मूळ मार्गानेच व्हावी

माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा आधी निश्चित करण्यात आलेल्या मूळ मार्गानेच राबवण्यात यावा, या मागणीसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी (दि.15) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी या संदर्भातील सविस्तर निवेदन त्यांच्याकडे सादर केले.

- Advertisement -

नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-नारायणगाव-राजगुरुनगर-चाकण मार्गे पुणे अशी पूर्वी निश्चित करण्यात आलेली नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेची मूळ अलाइनमेंट भौगोलिक, तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत योग्य असल्याचे माजी मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले. हा मूळ मार्ग केवळ रेल्वे प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच नाशिक आणि पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचा कणा ठरणारा आहे. या मार्गामुळे उद्योग, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. या प्रकल्पासाठी 2018 मध्ये प्राथमिक डीपीआर तयार करण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक आणि पर्यावरणीय अडचणी लक्षात घेऊन 2019-2020 मध्ये सुधारित डीपीआर तयार करण्यात आला. या डीपीआरला रेल्वे मंत्रालयाची अंतिम मंजुरी देखील मिळाली होती.

YouTube video player

याशिवाय 8 मार्च, 2021 रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पास अंतिम मंजुरी दिली. प्रकल्पाचा एकूण खर्च 16 हजार 39 कोटी निश्चित करण्यात आला असून, त्यातील 3 हजार 200 कोटी (20 टक्के) हिस्सा राज्य सरकारचा आहे. यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता. तसेच मी महसूलमंत्री असताना या मूळ मार्गावरील भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भूसंपादनही झाले आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर पोहोचलेला होता, असे माजी मंत्री थोरात यांनी सांगितले.

अलिकडेच संसदेत दिलेल्या निवेदनात नाशिक-पुणे रेल्वेचा मूळ मार्ग बदलल्याचे जाहीर करण्यात आले. जीएमआरटीचा आधार देत मूळ अलाइनमेंट बदलण्यात आल्याने या मार्गावरील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे थोरात यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. नाशिक-शिर्डी किंवा अहिल्यानगर-पुणे मार्गाला आमचा विरोध नाही. मात्र नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ मार्गानेच झाली पाहिजे, ही या भागातील नागरिकांची ठाम अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या भेटीदरम्यान मूळ मार्गावरील नागरिकांच्या भावना, अपेक्षा आणि विकासाच्या आशा रेल्वेमंत्र्यांपर्यंत सविस्तरपणे पोहोचवल्या. हा मार्ग आत्ताच रेल्वेने जोडला गेला नाही, तर पुढील अनेक दशके या भागाला संधी मिळणार नाही. त्यामुळे ही लढाई केवळ एका नेत्याची नसून, संपूर्ण परिसराच्या भवितव्याची आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.

ताज्या बातम्या

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड...