संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांतील नागरिक व तरुणाई मोठ्या प्रमाणावर एकवटली आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या जनआंदोलनासाठी सोशल मीडियासह गावोगावी जनजागृती करण्यात आली असून, 9 ऑगस्ट (क्रांती दिन) रोजी 9 वाजता नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2000 पासून पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन, महारेल आणि रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.
2019 मध्ये या प्रकल्पासाठी भूसंपादन होऊन शेतकर्यांना सुमारे 600 कोटी मोबदला देण्यात आला. मात्र, सरकार बदलल्यानंतर प्रस्तावित मार्गात बदल करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. सरळ रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्र, नगर आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा संघर्ष समितीचा दावा आहे. या मागणीसाठी विविध तालुक्यांतील नागरिक, शेतकरी आणि युवक संघटनांनी पाठिंबा दर्शविला असून, अनेक लोकप्रतिनिधीही आंदोलनात सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे.
संगमनेर तालुक्यातील आंदोलन हिवरगाव पावसा टोलनाका येथे होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांनी या आंदोलनाची व्यापक जनजागृती केली असून, गावोगावी बैठका घेऊन नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीने सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन सरकारचे लक्ष वेधण्याचे केले आहे.




