नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात (District) विक्रमी पावसाची नोंद झाली असून, काही भागांत इतिहासात प्रथमच इतका मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संपूर्ण येवला तालुक्यात २४ तासांत तब्बल ११६ मिमी पावसाची नोंद झाली असून, अंदरसूल आणि नगरसूल महसूल मंडळात विक्रमी १५५ मिमी पाऊस झाला आहे.
धुळगाव परिसरात (Dhulgaon Area) शनिवार सायंकाळपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असून, धुळगाव ते सावरगाव रस्त्यालगतची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, जळगाव नेऊर येथील गोई नदीला आलेल्या पुराने बंधारा वाहून गेला आहे.
मोठ्या प्रमाणावर धरणांमधून विसर्ग सुरू
सध्या परिसरातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून, काही प्रमुख धरणांचा विसर्ग पुढीलप्रमाणे आहे (क्युसेक्समध्ये)
- पालखे़ड – २३,९६८
- नांदुरमध्यमेश्वर – ४५,८६६
- करंजवन – १४५७०
- दारणा – १२१६७
- गंगापूर – ६५१३
- ओझरखेड – ३८७०
- पुणेगाव – ३८४०
या विसर्गामुळे गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. मनमाड शहरातील पांझन नदीच्या काठावरील झोपडपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः गवळीवाडा, इदगाह, स्लीपर कॉलनी, मनोरमा सदन आणि ठक्कर मोहल्ला परिसरातील नागरिकांनी (Citizen) सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी ठेवावी, असा इशारा मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी दिला आहे.
हवामानाचा पुढील अंदाज काय सांगतो?
हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत
- परतीचा मान्सून जागेवरच थबकणार
देशात परतीच्या मार्गावर असलेला मान्सून ३ ऑक्टोबरपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण टिकून राहणार. - तीव्र कमी दाबाची प्रणाली सक्रीय
आज पहाटे तयार झालेली तीव्र कमी दाबाची प्रणाली राज्यात दसऱ्यापर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता दर्शवते. - २२ जिल्ह्यांत पूरस्थितीची शक्यता
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील २२ जिल्ह्यांत ३० सप्टेंबरपर्यंत पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. - ८-९ ऑक्टोबरदरम्यान चौथ्या टप्प्यातील पावसाचा धोका कमी
अंदमानजवळ तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकणार असल्याने चौथ्या टप्प्यातील मुसळधार पावसाचा धोका कमी होणार आहे. - दसऱ्यानंतर उघडीप, पण मुंबईत धोका कायम
३ ऑक्टोबरपासून राज्यात काहीशी उघडीप असली तरी मुंबईत पावसाचा धोका दसऱ्यानंतरही कायम राहणार आहे,असेही खुळे यांनी सांगितले.
नागरिकांना आवाहन
सध्याच्या स्थितीत नदीकाठच्या, सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेती, वाहतूक आणि वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




