नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये (Nashik) मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे दुचाकी चालकांसह पादचाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळत आहे. अशातच रहदारीचा महत्त्वाचा नाशिक-त्र्यंबकेश्वर हा रस्ता देखील पिंपळगाव बहुल्याजवळ खचल्याने वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
आज (बुधवार) सकाळपासून नाशिक-त्र्यंबकेश्वर हा रस्ता (Nashik-Trimbakdeshwar Road) पिंपळगाव बहुल्याजवळ खचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आज सकाळपासून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस देखील बंद आहेत. याशिवाय नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस देखील बंद आहे.
दरम्यान, हा रस्ता बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह (Student) प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. तसेच खाजगी वाहतूक देखील बंद असल्याने प्रवाशांचे नाशिकला येण्यासाठी मोठे हाल होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




