Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेख‘सिटीलिंक’च्या मोहिमेचे नाशिककरांनी स्वागत करावे

‘सिटीलिंक’च्या मोहिमेचे नाशिककरांनी स्वागत करावे

नाशिक महानगराला देखणे करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली रंगसफेदी करण्याची कामे सध्या सुरू आहेत. त्या कामांना विकासही म्हटले जात आहे. नगराचे महानगर बनलेल्या नाशिकच्या वाहतूकसेवेचा प्रश्‍न काही काळापासून सतत चर्चेत होता. एसटी महामंडळाकडून शहर बससेवा चालवली जात होती, पण ही सेवा तोटा खाऊन करावी लागत असल्याचे रडगाणे महामंडळ गात होते. फार काळ तोटा सोसून नाशिकला वाहतूकसेवा देऊ शकणार नाही, अशा निर्वाणीच्या शब्दांत महामंडळाने मनपाला सांगून टाकले. वाढत्या नाशिकची गरज ओळखून बससेवा चालवण्याचा निर्धार नाशिक मनपाने तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर केला. कंबर कसली. सगळी जुळवाजुळव झाल्यावर गेल्या वर्षी जुलै महिन्यात मनपाची ‘सिटीलिंक’ बससेवा नाशिककरांच्या सेवेत रूजू झाली. ही सेवा सुरू होऊन नऊ महिन्यांचा काळ लोटला आहे. बससेवेला नाशिककरांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. दैनंदिन प्रवासी संख्येत होणार्‍या वाढीने नाशिक महानगर परिवहन महामंडळाचा उत्साहसुद्धा वाढत आहे. प्रवाशांची गरज, मागणी आणि प्रतिसादानुसार बससेवेचा टप्प्याटप्प्याने विस्तारही केला जात आहे. मात्र सेवा पुरवताना अनेक आव्हानांनाही ‘सिटीलिंक’ला सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक हितासाठी कोणताही उपक्रम राबवताना वा सेवा पुरवताना फायद्याचा विचार गौण ठरतो, पण दिली जाणारी सेवा तोट्याची ठरणार नाही याचेही भान राखावे लागते. ते न राखले गेल्यामुळे एसटीकडून नाशकात चालवली गेलेली बससेवा सतत तोट्यात राहिली. नाशिकच्या पुण्यभूमीत राहणारे नागरिक सुजाण आहेत. वाढते प्रदूषण आणि शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सार्वजनिक वाहतूकसेवेचा वापर लोकांनी करावा, असे आवाहन सरकारी पातळीवरून नेहमी केले जाते. ते आवाहन लक्षात घेऊन मनपा बससेवेला नाशिककरांनी आपुलकीने अंगिकारले आहे. नाशिककरांच्या प्रतिसादाने ‘सिटीलिंक’ प्रशासनसुद्धा भारावले आहे. बससेवा फायद्यात आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नववर्षात भाडेवाढीचा चटकाही प्रवाशांना दिला गेला. मागणीनुसार नजीकच्या ग्रामीण भागातही बससेवा सुरू करण्यात आली. बसेस आणि फेर्‍यांची संख्या गरजेनुसार वाढवली जात आहे. प्रवाशांचा प्रामाणिकपणा आजमावण्यासाठी एक चांगला उपक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. मनपा बससेवेतून कोणताही प्रवासी विनातिकीट प्रवास करणार नाही या हेतूने तिकीट तपासणी मोहीम सुरू झाली आहे. नऊ पथके त्यासाठी नेमली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत या पथकांना वेगवेगळ्या मार्गांवर केलेल्या तपासणीत सुमारे साडे पाचशे प्रवासी विनातिकीट आढळले. मात्र त्या प्रवाशांनी इमानदारीने दंड भरून सहकार्यही केले. दोन लाखांहून जास्त रक्कम दंड रुपाने वसूल झाली. प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना सापडलेले फुकटे प्रवासी तुलनेने नगण्यच म्हटले पाहिजेत. तथापि फुकट्या प्रवाशांची संख्या शून्यावर आणून राज्यात आणि देशात एक नवा आदर्श निर्माण करण्याचा मनपा बससेवेचा मानस या मोहिमेतून स्पष्ट होतो आणि तो यशस्वी करून दाखवणे ही सुजाण नाशिककरांची जबाबदारी ठरते. निवडणुकीत लोकांची मते मिळवण्यासाठी वस्तू आणि सेवा फुकट देण्याच्या घोषणा राजकीय पक्ष व त्यांचे नेते वर्षानुवर्षे करतात. काही गोष्टी विनामोबदलासुद्धा मिळतात. त्याची आता काही लोकांना सवय झाली आहे, पण कोणत्याही सेवेचा लाभ मोफत घेऊ नये हा साधा विचार काही जणांच्या पचनी कसा पडत नाही? मोफत मिळणारी कोणतीही वस्तू खरेच मोफत असते का? कधीतरी माफी मिळेल म्हणून भरमसाठ वीजबिले थकवणार्‍या, महावितरणला आर्थिक डबघाईस आणणार्‍या आणि तरीही वीजपुरवठा नियमित होत नसल्याची आरोळी ठोकणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. नाममात्र दराचे तिकीट काढून प्रवास करण्याचीसुद्धा ज्यांची कुवत नसेल अशा फुकट्यांबद्दल काय बोलावे? मनपा बसमधून प्रवास करणार्‍या प्रत्येक प्रवाशाने योग्य तिकीट काढूनच प्रवास करावा याकरता मोहीम राबवणार्‍या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या प्रयत्नांना नाशिककर नक्कीच पुरेसे पाठबळ देतील. एसटी महामंडळ आणि रेल्वेला फुकट्या प्रवाशांविरुद्ध वर्षातील 365 दिवस मोहीम राबवावी लागते. तो त्या सेवांच्या कामकाजाचा भागच झाला आहे. मात्र नाशिकमध्ये मनपा बससेवेत फुकटे प्रवाशी हुडकण्याची वेळ भविष्यात येणारच नाही, प्रवासीसुद्धा योग्य ते तिकीट काढून बसप्रवास करतील, त्याकरता पथकांची योजना करण्याची गरजच पडणार नाही, अशी आशा आता सुजाण नाशिककरांच्या वतीने व्यक्त करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या