नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभा निवडणूकीमुळे (Loksabha Election) १६ मार्चपासून लागू असलेल्या आदर्श आचारसंहिता काळात नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Nashik Rural Police) जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करीत ३ कोटी ५३ लाख ५२ हजार २६२ रुपयांचा अवैध मद्यसाठा व प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे सुमारे ३ हजार २०० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई (Action) करीत दणका दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील परवानाधारक ७५१ शस्त्रधारकांकडून पिस्तुल जमा केल्या आहेत. तसेच अवैध (Illegal) वाहतूक प्रकरणी १२१ गुन्हे दाखल केले आहेत. तर ८ हजार५४८ चालकांविरोधात वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना ७५ लाख ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. निवडणूकीमुळे देशभरात १६ मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करीत ३ कोटी ५३ लाख ५२ हजार २६२ रुपयांचा अवैध मद्यसाठा व प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे सुमारे ३ हजार २०० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांनी लोकसभा मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. निवडणूकीदरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १६ मार्च ते ६ मे या कालावधीत पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी १ हजार १२६ गुन्हे दाखल करून ८७ हजार ४४० लिटर देशी, विदेशी व गावठी दारु जप्त केली आहे. तसेच अवैध गुटख्याप्रकरणी ७८ गुन्हे दाखल केले आहेत. तर, जिल्ह्यातील ३२ सराईत गुन्हेगार तडीपार आहेत. तर आणखीन ५० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ४ गुन्हेगारांवर एम. पी. डी. ए. कायद्यानुसार स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
शस्त्र बागळणारेही रडारवर
अवैध शस्त्रे बाळगून दहशत किंवा गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २१ गुन्हे दाखल करून गुन्हेगारांकडून ५ देशी कट्टे, १५ तलवारी, ८ कोयते-चॉपर, फायटर अशी शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच इतर गुन्ह्यांमध्ये फरार असलेले रेकॉर्डवरील ५७ संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड केली आहे. २ हजार ९७३ टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच फसवणूकीच्या गुन्ह्यातील संशयित, सराईत गुन्हेगारव दखलपात्र गुन्हे करू शकणाऱ्या संशयितांनाही चांगल्या वर्तवणूकीचे हमीपत्र देण्याचे सांगत त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.