Sunday, September 20, 2026
HomeनाशिकNashik Simhastha News : सिंहस्थाच्या आढावा बैठकीत त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीवरून वाद; महंत हरीगिरी...

Nashik Simhastha News : सिंहस्थाच्या आढावा बैठकीत त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीवरून वाद; महंत हरीगिरी महाराजांचा आक्षेप, महाजनांची मध्यस्थी

नाशिक | Nashik

नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१९ सप्टेंबर) रोजी कुंभमेळा व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे, पूर्वतयारीत कोणतीही शिथिलता राहू नये, असा संकल्प करण्यात आला. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील धरण आणि घाटावर (Dam and Ghat) उभारण्यात येणाऱ्या त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीवरून जुना आखाड्याचे महंत हरीगिरी महाराज यांनी तीव्र आक्षेप घेतल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ही बैठक चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -

त्रिपुंडवरून वाद आणि नाराजी

कुंभमेळामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीच्या सुरुवातीला त्र्यंबकराजाची (Trimbakraj) एक लहान प्रतिकृती सादर करण्यात आली. मात्र, या प्रतिकृतीवरील मुखवट्याला महादेवाचा गंध अर्थात ‘त्रिपुंड’ न लावता गोल टिपका लावण्यात आल्याचे पाहून आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरीगिरी महाराज यांनी प्रशासनाला धारेवर धरले. धार्मिक परंपरेचा अनादर होत असल्याचा आरोप करत आणि प्रशासनाकडून दुजाभाव केला जात असल्याचे सांगत त्यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित इतर साधू-महंतांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते पुन्हा आसनस्थ झाले आणि पुढील कामकाज सुरू झाले.

भाविकांच्या सोयी-सुविधा आणि विकासकामांवर भर

तणाव निवळल्यानंतर बैठकीत भाविकांच्या सोयी-सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. यात वस्त्रांतरगृहे, स्वच्छतागृहे, माहिती केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि निवासासाठी खोल्यांची उपलब्धता यांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच त्र्यंबकेश्वरसह सप्तश्रृंगी देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विकास, आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण आणि वाहनतळांचे (पार्किंग) योग्य व्यवस्थापन करण्याच्या मागण्या साधू-महंतांनी केल्या.

ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती उपस्थित राहणार

दरम्यान, ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना विशेष निमंत्रण दिले जाणार असून, त्या सोहळ्यास उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या मुहूर्तावर हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि अन्य नेते या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. यामध्ये रामकुंड, कुशावर्त तसेच नील पर्वत परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. तसेच गोदावरी आरती, दिव्य संध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, कुंभगीत, शंखनाद आदी कार्यक्रमांसह संकेतस्थळ आणि कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून सिंहस्थाची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले, “साधू-महंतांना नियोजनाबाबत कोणताही आक्षेप नाही. प्रशासनाने त्र्यंबकराजाची प्रतिकृती बसवण्याबाबत आखाड्यांच्या महंतांना पूर्वकल्पना देऊन विश्वासात घ्यायला हवे होते, एवढाच त्यांचा मुद्दा होता. हा अंतर्गत गैरसमज असून तो लगेच दूर झाला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासकामांसाठी निधी देताना कोणताही दुजाभाव केलेला नाही. हा कुंभमेळा जगातील सर्वांत उत्कृष्ट सोहळा ठरेल, असे त्यांनी सांगितले.

प्रमुख लोकप्रतिनिधी व महंतांची उपस्थिती

या बैठकीस महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्यासह जिल्हाधिकारी, आमदार, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह श्रीमहंत प्रेमगिरी महाराज, श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, श्रीमहंत धनंजय गिरी, श्रीमहंत दिपेंद्र गिरी, महंत भक्त चरणदास, गिरीजानंद सरस्वती आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Manisha Jejurkar Suicide Case : डाॅ. नीलेश जेजुरकरला चार दिवसांची पोलीस कोठडी;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik गंगापूर रोड येथील डॉ. मनीषा जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) यांच्या आत्महत्या प्रकरणात (Suicide Case) तब्बल १९३ दिवसांनंतर नाशिक जिल्हा शासकीय...