पंचवटी । प्रतिनिधी Panchavati
वाईट प्रवृत्तीचा नाश करून सत्याचा विजय होतो, असा संदेश देत चतुःसंप्रदाय आखाड्यातर्फे परंपरेनुसार रामकुंड परिसरात रावणदहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी क्रेनच्या साह्याने उभारण्यात आलेल्या ५१ फूट उंच रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले.
चतुःसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास महंत डॉ. भक्तीचरणदास महाराज, महंत पितांबरदास महाराज, महंत संतोकदास महाराज आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.रावणदहन पाहण्यासाठी रामकुंड, गांधी ज्योत, गांधी तलाव परिसर तसेच होळकर पुलाजवळ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा गांधी तलावात पाणी नसल्याने तलावाच्या मोकळ्या जागेत उभे राहून नागरिकांनी रावणदहनाचा सोहळा अनुभवला.
रावणदहनापूर्वी पंचवटी परिसरातून राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण, बिभीषण, वानरसेना आणि राक्षससेनेची वेशभूषा केलेल्या कलाकारांची मिरवणूक काढण्यात आली. प्रथमेश काळे, क्रिश आढाळकर, आदित्य शिंदे, यश कोठावदे, छोटुराम आढाळकर, विवेकानंद घोडके आणि प्रिंतेश बैरागी यांनी विविध भूमिका साकारल्या.मिरवणूक रामकुंड परिसरात पोहोचल्यानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात आली. यावेळी कलाकारांनी राम-रावण युद्धाचा प्रसंग सादर केला. त्यानंतर रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र आढाळकर, सागर कापसे, कृष्णकुमार नेरकर, आदित्य शिंदे, रोहित कोठावदे, निलेश बैरागी,रवी आढाळकर, घनश्याम गंधे, महेश बैरागी, कपिल भोरे, संकेत बैरागी, महेश गंधे यांच्यासह बालाजी भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.




