नाशिक | Nashik
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नियोजनाच्या दृष्टीने आढावा घेण्यात येत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी परिसरातील देवस्थान व पर्यटन स्थळांवर होण्याची शक्यता लक्षात घेत त्याठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर या जिल्हा प्रशासन आणि त्या जिल्ह्यातील देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवून माहिती घेण्यात येणार आहेत.
प्रयागराजच्या कुंभमेळ्यात भाविकांच्या गर्दीचा लोट पाहता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कालावधीत प्रत्येक पर्वणीला ७० ते ८० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. परिणामी कुंभनगरीत आलेले भाविक जवळच्या धार्मिक स्थळ व पर्यटनस्थळांना भेटी देऊ शकतात. त्यामुळे नाशिक लगतच्या जिल्ह्यातही धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ हॉटेल्स, रेल्वेस्थानक, बसस्थानक याठिकाणी गर्दी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने संबंधित जिल्हा प्रशासनाची तसेच तेथील मंदिर ट्रस्टची गर्दीच्या दृष्टीने काय नियोजन आहे, याची माहिती घेण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून अहिल्यानगर, पुणे, संभाजीनगर या जिल्हा प्रशासनाला आणि संबंधित जिल्ह्यातील देवस्थान ट्रस्टला पत्र पाठवण्यात येणार आहेत.
दरम्यान, प्रयागराज येथे सिंहस्थासाठी आलेल्या भाविकांनी त्यानंतर वाराणसी येथे गर्दी केल्याचे चित्र होते. परिणामी नाशिक जिल्हा प्रशसनाकडून ही चाब लक्षात घेऊन नाशिक लगतच्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या मंदिर ट्रस्ट्र व जिल्हा प्रशासनाला गर्दी नियोजनाची काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यासाठी पत्र पाठवण्यात येणार असून सिंहस्थाच्या पार्श्वभूमिवर संबंधित मंदिर ट्रस्टनी गर्दी होईल, या दृष्टीकोनातून तयारी करण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत.
यांना देणार पत्र
पुणे-भिमाशंकर, देहू आळंदी, जेजुरी, अहिल्यानगर शिर्डी, शनि शिंगणापूर, संभाजीनगर-घृष्णेश्वर, अजिंठा वेरूळ, नाशिक-वणी.
शाळांची माहिती संकलित
कुंभमेळ्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडून शाळांची माहिती संकलित करण्यात आली आहे. शाळांमधील वर्गखोल्यांच्या आधारे भाविकांच्या निवासाची व्यवस्था करणे सोपे जाणार असल्याचे माहिती संकलित करण्यात येत आहेत. यात नाशिक मनपाच्या १०१ शाळा आहेत. तर जिल्हा परिषदेच्या ४५० शाळा आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा