सिन्नर | विलास पाटील | Sinnar
अर्ज माघारीच्या काल (दि.२१) अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी (Town Council President) एकाही उमेदवाराने (Candidate) माघार न घेतल्याने थेट नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर १९ उमेदवारांनी माघार घेतल्याने नगरसेवकपदाच्या ३० जागांसाठी १०५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. नगराध्यक्षपदासाठी नामदेव प्रताप लोंढे (शिवसेना शिंदे गट), विठ्ठल नामदेव उगले (राष्ट्रवादी अजितदादा पवार), प्रमोद झुंबरलाल चोथवे (शिवसेना उबाठा), हेमंत विठ्ठल वाजे (भाजपा), किशोर सुरेश देशमुख (अपक्ष) यांच्यात लढत होणार आहे.
नगरसेवकपदासाठी (Corporator) ज्योती रामनाथ कोठुरकर, शोभा दिलीप गोजरे (दोघीही प्रभाग १), सुनिल वाळीबा उगले व उमेश मधुकर गायकवाड (दोघेही१-ब), स्मिता पंकज जाधव (२अ), माजी नगरसेवक संतोष एकनाथ शिंदे व अजित भास्कर गीते (दोघेही २ ब), दुर्गेद्र रमेश क्षत्रीय (५३), दर्शन कृष्णा कासार (६ ब), विकास कृष्णा जाधव (७ अ), अनिता राकेश धनगर, निकिता रोहित पाबळे (दोघीही ७ ८), अलका दिलीप लहामगे (८ अ) नंदलाल बाबुलाल जाधव (८ ब), योगिता देवेश उगले (९ अ), अर्जुन हरिभाऊ कोतवाल, दत्तात्रय तुकाराम हांडे (दोघेही ९ ब), रोहित मार्क्स निकाळे (१० ब), माजी नगरसेवक शैलेंद्र बन्सीलाल नाईक (१२ अ) यांनी अर्ज मागे घेतले.
दारूवाले यांची बंडखोरी
माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारूवाले यांना प्रभाग ६ व मधून ना. कोकाटे यांनी उमेदवारी नाकारत प्रशांत सोनवणे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली आहे. दारूवाले यांनी पूर्वी दोनदा विजय मिळवला असून सन २०१५ च्या निवडणूकीत माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी त्यांचा पराभव केला होता. यामेळी ते पुन्हा उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, नवा तरुण उमेदवार देण्याची घोषणा करणाऱ्या कोकाटे यांनी प्रशांत सोनवणे यांना उमेदवारी दिल्यानंतर दारुवाले काहीसे नाराज झाले होते. अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीच्या काळात ते कुठे दिसलेही नाहीत. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी ‘अपक्ष’ म्हणून अर्ज दाखल करत सर्वांनाच धक्का दिला. नव्या प्रभाग रचनेत या प्रभागात काजीपुऱ्याचा काही भाग जोडण्यात आला असून मुस्लिम समाजाच्या ४००-४५० मतांचा या प्रभागात समावेश झाला आहे. आधीच्या मतदारांचा विचार करता या प्रभागात आता मुस्लीम मतदारांची संख्या ६००-६५० वर पोहचली असल्याने त्यांची ही बंडखोरी राष्ट्रवादी व शिवसेना (उबाठा) दोघांसाठी त्रासदायक मानली जात आहे.
ठाकरे सेनेचे २९ उमेदवार
शिवसेना उबाठा पक्षाने नगरसेवकपदाच्या ३० जागांपैकी २९ जागांवर उमेदवार दिले असून एक जागा महाविकारा आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसला सोडली आहे. त्यामुळे आघाडीतील दोन्ही पक्षांचे मिळून ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रभाग तीन मधील एकाच जागेची मागणी केली होती. मात्र, त्यांच्यासाठी ही जागा सोडली नसल्याने या पक्षाचे हरिभाऊ तांबे यांनी बंडखोरी करत प्रभाग तीन मधील जागेवर आपली उमेदवारी ठेवली आहे. त्यामुळे तेथील लढतीत शिवसेना व कम्युनिस्ट पक्षाची मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळणार आहे.
पती-पत्नीच्या दोन जोड्या
शिवसेना उबाठा पक्षाने प्रभाग १४ अ मधून माजी नगरसेवक पंकज मोरे व त्यांची पत्नी ज्योती मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून प्रभाग १ मधून दोन्ही जागांसाठी गणेश खर्जे व त्यांची पत्नी पुजा खर्जे उमेदवारी करीत आहेत, त्यामुळे प्रथमच दोन पती-पत्नीच्या जोड्या रिंगणात आहेत. यापूर्वी स्व. हरिश्चंद्र लोंढे न त्यांच्या पत्नी भामाताई लोंढे यांनी एकाचवेळी नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. तसेच लोंढे यांचे पुतणे नामदेव लोंढे व त्यांच्या पत्नी चित्रा लोंढे यांनीही एकाच वेळी नगरसेवक म्हणून काम केले आहे.
चांगली बातमी दवडली
आज माघारीची वेळ संपत असताना गणेश खर्जे व त्यांची पत्नी पूजा निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या केबिनमध्ये आले. त्यांच्या छातीवर ‘धनुष्यबाणा’चा बिल्ला दिसल्याने ‘चांगली बातमी मिळणार म्हणून पत्रकारांनी केबिनकडे धाव घेतली. शिंदे सेनेकडून अर्ज दाखल करताना त्यांनी दोन अपक्ष अर्जही भरले होते. ते अर्ज मागे घेण्यासाठी ते आले होते मात्र पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला असल्याने अपक्ष फॉर्म आपोआप बाद ठरेल, असे अधिकारी नाईक यांनी राांगताच ते केबीनबाहेर पडले यापूर्वी शिंदे सेना पक्षाच्या एका अधिकृत उमेदवाराने व राष्ट्रवादीच्या एका अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने शिंदे सेनेची चांगली बातमी हाती लागल्याच्या अविर्भावात धावत आलेल्या पत्रकारांचा, ‘अर्ज मागे घेतला जाणार नाही’, असे समजताच हिरमोड झाला.
बसपची पाटी कोरी
बहुजन समाज पक्षाने रोहित मार्क्स निकाळे यांना प्रभाग १० व मधून उमेदवारी दिली होती. त्यांनीही निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. या पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अनिता निवृत्ती चाबूकस्वार अर्ज दाखाल करताना एक मिनिट उशिरा पोहोचल्याने त्यांना पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करता आला नव्हता. तिथे एक उमेदवारही रिंगणातून बाहेर पडल्याने या पक्षाची पाटी निवडणुकीत कोरीच राहिली आहे.




