राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक 26 जून रोजी होत असल्याने इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. कोपरगाव येथील संजिवनी एज्युकेशन संस्थेचे ट्रस्टी विवेक बिपीनराव कोल्हे यांनी या निवडणुकीत उडी घेतली असल्याने या विभागातील पाचही जिल्ह्यात त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे. शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या टिडीएफ चा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात येवल्याचे आमदार किशोर दराडे हे निवडून आले होते. त्यांच्या विजयाने पहिल्या टिडीएफच्या विजयाच्या परंपरेला छेद दिला. शिर्डीत नुकतीच टिडीएफ ची राज्यस्तरीय बैठक झाली होती. त्यात नगर जिल्ह्यातून प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याप्रमाणे त्यांना या मतदार संघातून उमेद्वारी जाहीर झाली आहे. त्यांनी यापुर्वीही या मतदार संघातून निवडणूक लढविली आहे. यावेळीही ते निवडणुकीच्या रिंगणात राहाणार आहेत.
विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांनी निवडणूक लढविण्यासाठी सुरुवातीला चाचपणी केली. त्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक संस्था आहेत. शिवाय गणेश विद्या प्रसारक ही संस्थाही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आहे. त्यांनी या सर्वांचे मते जाणून घेवून निवडणुकीची तयारी केली आहे. तशी यंत्रणा त्यांनी अल्पावधीत नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यात राबविली जात आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पुणे विभागातील टॉपचे असेलेले संजिवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ते ट्रस्टी आहेत.
नगर जिल्ह्यात सर्वात कमी वय असलेले अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणून त्यांची छाप पडली आहे. अडचणीतील गणेश कारखान्याला त्यांनी संजिवनी देण्याचे काम केल्याने नगर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाची छाप पडली आहे. शैक्षणिक संस्थांचा अभ्यास, अडचणीतील शाळांना व विद्यार्थ्यांना दत्तक घेणे हे काम त्यांनी केले आहे. संजिवनी शैक्षणिक संस्था तसेच गणेश विद्या प्रसारक संस्थेतील विविध समस्या त्यांनी सोडविण्याचे काम केले आहे. विवेक कोल्हे यांच्या अभ्यासू कार्यशैलीमुळे नॅशनल शुगर इन्स्टिट्युट कानपूरच्या वतीने दखल घेत राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार संजिवनी उद्योग समुहास मिळाला आहे. या निवडणुकीत विवेक कोल्हे, शिक्षक मतदार संघाचे आमदार किशोर दराडे, टिडीएफचे उमेद्वार प्रा. भाऊसाहेब कचरे, नाशिकचे अॅड. संदीप गुळवे, धुळे येथील निशांत रंधे, नगरचे आप्पासाहेब शिंदे, दत्तात्रय पानसरे आदी उमेद्वार आमने-सामने येणार आहेत.