नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Local Body Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस प्रचंड राजकीय खळबळ घेऊन आला. महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असले तरी, नाशिकमध्ये (Nashik) युतीच्या घटकपक्षांमध्येच प्रचंड नाराजी आणि बंडखोरी उफाळून आली आहे. महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी, महायुतीत फूट पडल्याचे समोर आले.
महायुतीत शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांनी अर्ज दाखल केला. मात्र, जागेसाठी हट्ट धरून बसलेल्या भाजपाकडून मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी भाजपासह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असतानाच त्यांचे बंधू गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ट्विस्ट निर्माण केला आहे. याबरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद हिरे यांनीही अर्ज दाखल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कड़ून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे खंदे समर्थक प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांनी अर्ज दाखल करत महायुतीलाच आव्हान दिल्याने महायुतीत सर्व काही अलबेल नाही, हे समोर आले आहे. महायुतीत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप गोरख बोडके यांनी केला. दुसरीकडे म्हैसधुणे यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,मंत्री छगन भुजबळ आणि जिल्हयातील आमदारांशी चर्चा करून उमेदवारी करत असल्याचे सांगितले. बोडके असो की, म्हैसधुणे यादोघांसोबत यावेळी पक्षाचे कोणतेही नेते, आमदार, पदाधिकारी उपस्थितीत नव्हते.
हे देखील वाचा : Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : पक्षाच्या अधिकृत उमेदवारीवरून गोंधळ; नांदेड, छत्रपती संभाजीनगर, रायगडमध्ये बंडखोरी
गोकुळ गितेंची एन्ट्री
नाशिकच्या जागेसाठी आग्रही असलेल्या भाजपकडून माजी सभापती गणेश गिते यांनी यापूर्वीच पक्षाकडून तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मात्र, अखेरच्या दिवशी गणेश गिते यांचे बंधू तथा पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ गिते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत धक्का दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास काही मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाच गोकुळ गिते यांनी गणेश गिते यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्यांच्या उमेदवारी अर्जावर इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिवसेनेतंर्गत गटबाजी
शिवसेनेने दराडेंना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातंर्गत असलेली गटबाजी उफाळून आल्याचे चित्र आहे. दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे गैरहजर होते. तर, पक्षाचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांनीही दांडी मारली. पक्षाचे अनेक नगरसेवकही गैरहजर होते.
हे देखील वाचा : Nashik Vidhan Parisahd Election : विधानपरिषद निवडणुकीसाठी नऊ जणांचे तब्बल ‘इतके’ अर्ज दाखल; छाननीत कुणाचे अर्ज बाद होणार?
राष्ट्रवादीच्या आमदारांची पाठ
दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना जिल्हयात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादीचे एकही आमदार उपस्थितीत नव्हते. मंत्री भुजबळ यांसह सर्वच आमदारांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. याशिवाय पक्षाचे पदाधिकारी देखील फिरकले नाही. राष्ट्रवादीचे बोडके, म्हैसधुणे यांच्या समवेतही पक्षाचे कोणतेही आमदार वा पदाधिकारी उपस्थित नव्हते. याउलट महायुतीचे उमेदवार दराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपातील पक्षाच्या गटनेत्या सीमा ठाकरे उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थितीत राहूनही ठाकरे हे दोघाही उमेदवारांकडे अर्ज दाखल करण्यासाठी गेले नसल्याचे दिसून आले.




