नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Vidhan Parishad Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नऊ उमेदवारांनी १४ अर्ज दाखल केले. या उमेदवारी अर्जांची आज (मंगळवारी) सकाळी छाननी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद (Aayush Prasad) यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (Application for Candidacy) दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ९ जणांचे १४ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची आज (दि.२ जून २०२६) रोजी सकाळी ११ वाजता छाननी करण्यात येईल.४ जून २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. तर १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या कालावधीत मतदानाची (Voting) प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होईल.
या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती केली असून त्यांचे नाशिक येथे आगमन झाले आहे. ते भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण ६२२ मतदार (Voter) असून मतदान मतपत्रिकेवर होणार आहे. मतदारांना मत पत्रिकेवर आपला प्राधान्य क्रम नोंदवायचा आहे. त्यासाठी संबंधित मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले.




