Monday, June 22, 2026
HomeनाशिकNashik Vidhan Parisahd Election : शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचा उत्साह पडला महागात; भाजप नगरसेवकांची...

Nashik Vidhan Parisahd Election : शहराध्यक्षांच्या ड्रायव्हिंगचा उत्साह पडला महागात; भाजप नगरसेवकांची बस थेट भिंतीवर आदळली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांना (BJP Corporators) सहलीसाठी रवाना करण्यात येत असताना नगरसेवकांना घेऊन जाणारी लक्झरी बस हॉटेलच्या आवारातील भिंतीवर जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात (Accident) कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र काही काळ गोंधळ उडाला.

- Advertisement -

नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपच्या मतदार नगरसेवकांना ठाणे जिल्ह्यातील (Thane District) भिवंडी येथील एका रिसॉर्टवर हलविण्याची तयारी सुरू होती. सर्व नगरसेवक बसमध्ये बसल्यानंतर भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांचा उत्साह अनावर झाला. त्यांनी बस चालकाला सीटवरून उठवून स्वतःच स्टेअरिंगचा ताबा घेतल्याची चर्चा आहे. मात्र बस सुरू होताच वाहनावरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणांतच लक्झरी बस हॉटेलच्या आवारातील भिंतीवर जाऊन धडकली.

हे देखील वाचा : Nashik NCP News : विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र रद्द, पदावर गंडांतर

बसमधील नगरसेवक आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने बसचा (Bus) वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. बसचे किरकोळ नुकसान झाले असून, सर्व नगरसेवक सुखरूप आहेत. राजकीय समीकरणांइतकीच आता या बसच्या धडकेचीही चर्चा रंगू लागली आहे. एका बाजूला विजयाची खात्री, तर दुसऱ्या बाजूला नगरसेवकांची रिसॉर्ट पॉलिटिक्स आणि त्यात शहराध्यक्षांच्या अतिउत्साहाने निवडणुकीत आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घातली आहे.

महायुतीचे नगरसेवक भिंवडीतील ‘रिसॉर्ट’वर

स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) कोणतीही जोखीम न पत्करता ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’चा अवलंब केला आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे नरेंद्र दराडे हे प्रबळ उमेदवार असताना आणि विजयासाठी आवश्यक बहुमत हाताशी असतानाही, मतदारांना (नगरसेवकांना) सुरक्षित ठेवण्यासाठी भिवंडी येथील एका रिसॉर्टवर हलवण्यात आले आहे. महायुतीने बंडखोरांचे बंड शमवले असले, तरी निवडणुकीत विजय निश्चित करण्याच्या उद्देशाने ही व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चा आहे.

भाजपच्या नगरसेवकांना व्हीप जारी

सहलीला जाण्यापूर्वी भाजपच्या सर्व मतदारांना शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून अधिकृत ‘व्हीप’ जारी करण्यात आला आहे. हे नगरसेवक रिसॉर्टवर १८ जूनपर्यंत मुक्कामी असणार आहेत. या काळात त्यांच्यासाठी विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विधानपरिषदेतील पसंतीक्रमाची मतदान पद्धती काहीशी गुंतागुंतीची असल्याने, अनेक नवीन नगरसेवकांना या प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचे शिवसेनेचे नेते उपमहापौर विलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : ‘ओपन बार’ आणि रात्रीचा गोंधळ; आदेशांची काही दिवस ‘पकडापकडी’, आता पुन्हा ‘जैसे थे’

नगरसेवकांना महायुतीचे नेते करणार मार्गदर्शन

बुधवारी (दि.१७) या रिसॉर्टवर महायुतीच्या दिग्गज नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे उपस्थित राहून नगरसेवकांना निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे आणि उदय सामंत हे देखील नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.

महायुतीची सावधगिरी

नरेंद्र दराडे यांच्यासह गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे यांची नावे तांत्रिकदृष्ट्या मतपत्रिकेवर आहेत. तरी, मतांचा दगाफटका टाळण्यासाठी महायुतीने आपल्या तिन्ही घटक पक्षांच्या नगरसेवकांना एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेने (शिंदे गट) चे सुमारे १०० नगरसेवक १३ जूनलाच ठाण्याकडे रवाना झाले आहेत. भाजपचे नगरसेवक सोमवारी (दि.१५) रवाना झाले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे नगरसेवक आज किंवा उद्या रवाना होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या