Monday, May 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला; भुजबळ-महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघळला; भुजबळ-महाजन यांच्यात शाब्दिक युद्ध

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसताना, यावरून महायुतीतील राजकीय तणाव वाढतच चालला आहे. स्वातंत्र्यदिनी नाशिकमध्ये ध्वजारोहणाचा मान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ यांनी महाजन यांना खोचकपणे, ‘जळगाव आणि जामनेरकडेही लक्ष द्या,’ असा सल्ला देत टोला लगावला. यावर महाजन यांनीही प्रत्युत्तर देत, “जळगावची चिंता करू नका, मी नाशिकलाही येईन,’ असे सांगत राजकीय वादाला तोंड फोडले आहे.

हा वाद आता थेट जळगावपर्यंत पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा पक्षप्रवेश सोहळा घडवून आणला. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्यासह २८ सरपंच आणि इतर नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी यावेळी सत्तेचा वापर लोकांच्या कामांसाठी होतो, असे सांगत भुजबळ यांच्या सल्ल्याला अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले. ‘सत्तेत असलो तर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

जळगावात राष्ट्रवादीचे भाजपला आव्हान
जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने जळगावात पक्ष विस्ताराला गती दिली आहे. यामुळे भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. भुजबळ यांनीही नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार असल्याने पालकमंत्रीपदावर पक्षाचा हक्क असल्याचा दावा केला आहे. ‘सात आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळायलाच हवे,’ असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, महायुतीतील पक्षांमध्ये पक्ष विस्ताराची स्पर्धा तीव्र झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. यातच अजित पवार यांनी जळगावात पक्षप्रवेश घडवून आणल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अवलंबून आहे. अजित पवार यांनीही यावर सूचक विधान करत, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय होईल,’ असे सांगितले. मात्र, जोपर्यंत हा तिढा सुटत नाही, तोपर्यंत महायुतीतील अंतर्गत कलह कायम राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीची आज मतमोजणी

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Rahuri Assembly By Election) झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष आज होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत...