दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi
भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान महाराष्ट्रातील शेगाव येथे चार दिवसीय “राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026” आयोजित करण्यात येणार आहे. औषधी वनस्पती लागवड, कृषी वनीकरण आणि आयुष उपचारपद्धतींबाबत जनजागृती करणे तसेच शेतकऱ्यांसाठी नवीन उपजीविका संधी निर्माण करणे हा या मेळ्याचा मुख्य उद्देश आहे.
मेळ्याचे उद्घाटन 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर होणार असून, राज्यपाल, राज्य सरकारचे अधिकारी आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मेळ्यात आयुर्वेद, योग-निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी यांसारख्या आयुष शाखांद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आयुष औषधनिर्मिती कंपन्यांकडून संशोधन, गुणवत्ता मानके आणि उत्पादन पद्धतींचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांसाठी औषधी पिकांची लागवड, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन याविषयी मार्गदर्शन देणारा विशेष उपक्रम हा मेळ्याचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी “आयुर्वेदिक शेती, उत्पादन आणि विपणन” या विषयावर विशेष कार्यक्रम होणार आहे.
केंद्रीय मंत्री जाधव यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत औषधी वनस्पती लागवडीचा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन केले असून यामुळे शाश्वत उत्पन्न वाढेल आणि नागरिकांना नैसर्गिक उपचार उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि आयुष क्षेत्रातील घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





