नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात युरोपियन देश सायप्रसला पोहचले आहे. यावेळी सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडौलिड्स (Nikos Christodoulides) यांनी पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III (Grand Cross of the Order of Makarios-III) देऊन सन्मानित केले. याच बरोबर त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या (India) लढाईला जाहीर पाठिंबा दिला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी सायप्रसच्या भूमीवरून पुन्हा एकदा जगाला (World) भारताच्या वाढत्या सामर्थ्याची जाणीव करून दिली. तसेच मोदींनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस ३ सन्मान स्वीकारल्यानंतर राष्ट्राध्यक्ष निकोस यांचे आभार मानत मी सायप्रस सरकार आणि सायप्रसच्या लोकांचे मनापासून आभार मानतो. हा केवळ नरेंद्र मोदींसाठीच नाही तर १४० कोटी भारतीयांसाठीही सन्मान आहे. हा आपल्या भारतीयांच्या क्षमता आणि आकांक्षांचा सन्मान आहे. हा आपल्या संस्कृती, बंधुत्वाचा आणि वसुधैव कुटुंबकमच्या विचारसरणीचा सन्मान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Humbled to receive the 'Grand Cross of the Order of Makarios III' of Cyprus. I dedicate it to the friendship between our nations. https://t.co/x4MX3UZbtW
— Narendra Modi (@narendramodi) June 16, 2025
दरम्यान, रविवारी सायप्रसच्या लिमासोल शहरात झालेल्या व्यवसाय गोलमेज परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “धोरणनिर्मितीतील स्थिरता, व्यावसायिक वातावरणात सुधारणा, डिजिटल क्रांती आणि पुढील पिढीतील सुधारणांमुळे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लवकरच भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल”, असे त्यांनी म्हटले.
सायप्रस द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर
यावेळी पंतप्रधानांनी सायप्रससोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या शक्यतांवर भर दिला. ते म्हणाले की, “भारत आणि सायप्रसमध्ये व्यापार, गुंतवणूक, डिजिटल पेमेंट, पर्यटन, संरक्षण, लॉजिस्टिक्स आणि स्टार्टअप्स यासारख्या क्षेत्रात सखोल सहकार्य होऊ शकते. भारताच्या डिजिटल क्रांतीचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. आज जगातील ५० टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात, ज्याचे श्रेय युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ला जाते. या क्रमाने, NPCI इंटरनॅशनल आणि युरोबँक सायप्रस यांच्यात एक करार झाला आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील सीमापार पेमेंट शक्य होईल”, असे मोदींनी सांगितले.




