नवी दिल्ली | New Delhi
भारताशेजारील देश असणाऱ्या नेपाळने एक्स, फेसबुक, इन्स्टाग्रामसह २६ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यामुळे तरूणाचा उद्रेक झाला आहे. संतप्त झालेले जेन झीचं आंदोलक तरुण रस्त्यावर उतरत आपला विरोध दर्शवत असून, त्यांनी संसदेला घेराव घातला. त्यानंतर आता या तरुणांनी थेट संसदेला आग लावली असून येथील पंतप्रधान केपी शर्मा ओली (KP Sharma Oli) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resigns) दिला आहे.
नेपाळमधील हे तरुण आंदोलक हिंसक झाल्याने पोलिसांकडून (Police) त्यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला. यात २१ जणांचा मृत्यू झाला असून, ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सरकारने कालच सोशल मीडियावरील (Social Media) बंदी मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतरही येथील तरुणाईचा रोष कमी झालेला नाही. या आंदोलनाची धग देशभरात जाणवू लागली आहे.
दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान ओली दुबईला (Dubai) पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. वैद्यकीय उपचारांच्या बहाण्याने ते दुबईला जाऊ शकतात. नेपाळमधील (Nepal) खासगी विमान कंपनी असलेल्या हिमालय एअरलाइन्सचे विमान स्टँडबायवर ठेवण्यात आल्याचे बोलले जात असून, ओली कधीही देश सोडू शकतात.
आधी गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या आधी गृहमंत्री रमेश लेखक यांनी जेनझींच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच आरोग्यमंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता केपी शर्मा ओली यांनीही पंतप्रधानपदापासून दूर होण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला आहे.
नव्या पंतप्रधानांचा निर्णय संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता
केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नेपाळचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. सध्यातरी या पदासाठी नव्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. मात्र आज संध्याकाळपर्यंत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सध्या काठमांडू तसेच नेपाळमधील अन्य शहरांतील परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात असून, जागोजागी लष्कराचे जवान, पोलीस तैनात करण्यात आले आहेत.




