Sunday, May 19, 2024
Homeनंदुरबारचितवी गट व असली गण पोटनिवडणुक ; मतदानासाठी सुट्टी जाहिर

चितवी गट व असली गण पोटनिवडणुक ; मतदानासाठी सुट्टी जाहिर

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नवापूर (Navapur) तालुक्यातील चितवी जि.प.गट व अक्राणी तालुक्यातील असली पंचायत समिती (Panchayat Samiti) गणाच्या रिक्त जागेच्या (Election) पोटनिवडणूकीसाठी ५ जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेलक मतदान अधिकारी, कर्मचारी व मतदान साहित्य उद्या दि.४ जून २०२२ रोजी रवाना करण्यात येणार आहे.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील निवडणूक विभाग क्र.५२ चितवी या निवडणूक विभागात व अक्राणी तालुक्यातील निर्वाचक गण क्र.२९ असली या निर्वाचक गणात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयास ४ व ५ जून २०२२ या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहेत.

मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्याच्या सुचना

चितवी जि.प.गट व असली पं.स.पोटनिवडणूकीच्या मतदानासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुट्टी किंवा पुरेशी सवलत द्यावी, अशा सूचना जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर यांनी दिल्या आहेत.

श्री.रुईकर यांनी म्हटले आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते.

मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचीत राहतात. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक होणार्‍या मतदार क्षेत्रात मतदार असलेले कामगार,

अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणार्‍या क्षेत्राबाहेर कार्यरत असतील तरीही त्यांना निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

ही सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने आदींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचार्‍यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधितांसोबत मालकांनी घेणे आवश्यक राहील.

उद्योग व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने आदींचे मालक, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानासाठी सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

सर्व उद्योजक, आस्थापना, मालकांनी त्यांच्या उद्योगात, आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदार कामगार, अधिकारी, कर्मचार्‍यांना वर नमूद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत द्यावी.

सुट्टी जाहिर

चितवी व असली येथील पोटनिवडणूकीसाठी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी संबंधित पोट निवडणूक क्षेत्रातील मतदार, कामगारांना मतदानाच्या दिवशी दि.५ जून २०२२ रोजी दोन तासांची सवलत किंवा स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या