नाशिक | Nashik
स्त्री (Woman) शक्ती हीच समर्थ शक्ती किंवा स्त्री शक्ती हीच सिद्ध शक्ती आहे. या देवी सर्वभूतेषु मातृ संस्थेता नमस्ते नमस्ते नमस्ते नमो नम… साक्षात भगवती देवी अर्थात स्त्रीशक्ती सर्व प्राणी मात्र तसेच या भूतलावरील सृष्टीत मातृरूपात विराजमान आहे, त्या देवीला आदिशक्तीला मी त्रिवार वंदन करते. स्त्री ही अन्नपूर्णा असते तिच्यामुळेच घरच्या जेवणाला कस व चव असते, त्यामुळेच कुटुंबाचे आरोग्य ती उत्तम राखते. स्त्री सरस्वती असते म्हणून ती शिकलेली कमी असली तरीही कौटुंबिक व्यवहार अचूक ठेवते व मुलांवर संस्कार करते. स्त्री ही लक्ष्मी असते म्हणूनच ती काटकसरीने वागून वेळप्रसंगी संसाराला हातभार लावून आणि आता तर उत्तम नोकरी किंवा व्यवहारी कामे करून संसार समृद्ध करते व वेळप्रसंगी ती दुर्गा बनून संसारावरचे संकट पळवून लावते. म्हणूनच तसे पाहिले गेले तर आई,आजी, पत्नी, मावशी, आत्या, बहीण, मुलगी, सून व नात ही घरातील देवीची नऊ रुपे आहेत,असे म्हणणे योग्य होऊ शकते.
हे देखील वाचा : Rahul Gandhi : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संविधान…”; राहुल गांधींचा कोल्हापूरातून मोदींवर निशाणा
नोकरी (JOB) न करणाऱ्या स्त्रिया या घरात खूप मेहनत घेऊन घराला समृद्धीकडे नेतात, पण त्यांच्या कामाची किंमत केली जात नाही. त्या घरात नसतात तेव्हा त्यांची किंमत कळते. पण त्याची जाणीव मात्र राहत नाही, काही पुरुष मंडळी अपवादाने स्त्रीची तुलना दुसऱ्या स्त्रीशी करून घरच्या स्त्रीला दुखवत असतात.वास्तविक ईश्वराने प्रत्येक व्यक्तिमत्व एक स्वतंत्र घडवलेले आहे. प्रत्येकाचे गुण हे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. काही पुरुषांना याची जाणीव व ज्ञान असते व ते घरातल्या स्त्रीचा सन्मान व कौतुक करतात अर्थात त्यांचा संसार हा आनंदी व सुखाचा असतो. पण अपवादाने काही पुरुष जाणीव नसल्यामुळे घरातल्या स्त्रीशी नकारात्मक व तुलनात्मक वागतात त्यामुळे संसार हा दुःखाचा व कटकटीचा होतो. ज्या घरातली स्त्री दुःखी ते घर पैसा असला तरी नकारात्मक वातावरणाने भारलेले असते. म्हणून मी विनंती करेन की आपल्या स्त्रीचा सन्मान हीच आपली शान व प्रगती आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात NIA आणि ATS ची तीन जिल्ह्यांत छापेमारी; तिघे जण ताब्यात
कारण हसती खेळती स्त्री ही संसाराची सक्षम सारथी आहे, अशा कुटुंबामुळे समाज व पुढे आपला देश हा सुदृढ व समृद्ध होतो. हे सर्व कमीत कमी शब्दात स्त्रीच्या महतीचे यथार्थ वर्णन आहे. देवी अर्थात स्त्री शक्ती जर नसतीच तर निर्मिती झालीच नसती, म्हणूनच आपल्या महान संस्कृतीत देवीचा अर्थात स्त्री शक्तीचा नवरात्राचे (Navratr) मुहूर्त साधून यथोचित गौरव केला आहे. त्यामुळे यानिमित्ताने तू माता… तू दृष्टी आणि सृष्टी तू… चांदणं आणि सावली चंदनी तू… दुर्गा आणि अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती संसार संघर्षाची तूच यशस्वी कहाणी, असे म्हणत मी स्त्रीचा सन्मान करते.
कविता हर्षल कुलकर्णी, संस्थापक – रुद्रा कुलकर्णी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा