Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग संवेदनशिलतेचा

नवरंग स्त्री मनातले : रंग संवेदनशिलतेचा

ओंकारानंतर श्रेष्ठ मंत्र
असे आई
तिच्यासारखे दुसरे दैवत नाही
मातृदेवो भव.

आई मराठी भाषेतील सर्वांग सुंदर शब्द. या सुंदर शब्दात अखंड ब्रम्हांड तरुण जाण्याची शक्ती आहे. आणि   जन्माला येणार्‍या प्रत्येक जीवाला ती मिळत असते. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी आईसारखे दुसरे दैवत नाही. अशी वचने आपल्याला याची प्रचिती देतात. आपल्या मराठी साहित्यात आई हे फक्त काव्यच नाही तर महाकाव्य म्हणून प्रस्थापित होत गेलं. मराठीतचं नव्हे तर इतर साहित्यिकांनी साहित्य लिहून मातृत्वाचा अगाध महिमा वर्णन केला आहे. साने गुरुजी यांची श्यामची आई तर संपूर्ण साहित्यात अजरामर किर्ती सांगून गेली आहे. आणि असं बरंच काही. एकदा मी इयत्ता 10 च्या वर्गात फ. मु. शिंदे यांची आई ही कविता शिकवत होते. आई म्हणजे काय असते, लेकराची माय असते, लंगड्याचा पाय असते.

- Advertisement -

कवितेचं वाचन झालं. कवितेतला भाव जेव्हा मी वेगवेगळ्या प्रसंगातून उलगडत गेले तसतशी मुलं भावुक  होत गेली. तसे विद्यार्थ्यांना शिकवताना मी बर्‍याच वेळा विनोदी शैलीचा वापर करीत पाठाचा आशय. समजावत असते. हसत खेळत शिक्षण असा त्यामागचा उद्देश. पण आज विषय इतका मार्मिक होता त्यामुळे सगळेच शांत, स्थिर मनानं ऐकत होते. मी बोलत गेले, मुले ऐकत गेली. आई म्हणजे ममतेचं, संस्काराचं,  मायेने नटलेलं व्यासपीठ. आई मनातल्या वेदनेचा हुंकार तसा तो प्रेमाचा साक्षात्कार. माणसाच्या अस्तित्वाची सुरुवात असते आई.
 

मार्ग जीवनाचा असतो मोठा,
चुकली जरी वाट,
आई असते पाठीशी
ती देईल आपल्याला साथ.

आई या एका नात्याला लेकरू हा तीन अक्षरी शब्द पुरेसा होतो. त्यातून माया पाझरु लागते. आपल्याला आपल्या प्रत्येक संकटावर मात करायला शिकवणारी ती आपली आई असते. श्यामची आई देवा घरी जाते तेव्हा श्याम म्हणतो, माझ्या जीवनातील आशा गेली, प्रकाश गेला, जीवनाचे सूत्र तुटले, जीवन नौकेचे सुखानू नाहीसे झाले. आईचा महिमा सांगताना तो म्हणतो, साक्षात परमेश्वरालाही मातृभूमीचा महिमा पुरेसा गाता येणार नाही तो मौनांनीच वर्णन करावा लागेल.

अनंत मातृभूमीचा महिमा मौनानेच गावा, आई मुलावर पंचप्राणाची पांघरून घालते,  
जगज्जेता अलेक्झांडर आईचे आज्ञा वेद वाक्य मानीत असे. एवढेच नव्हे तर हिंदुस्थानातील सार्‍या पात शाह्या हलवणारे श्री शिवछत्रपती मातृ चरणाची पूजा करून प्रतापी झाले. जो आईची पूजा करेल, त्याची जग पूजा करील. ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणत,  की मी एकच देव ओळखतो तो म्हणजे माझी आई. माधुर्याचा सागर, पावित्र्याचे आगर, फुलांची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणियता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर पहायची असेल तर मुलांनो, क्षणभर आईजवळ बसा तुम्हांला सर्व काही मिळेल. जगातल्या प्रत्येक लेकरासाठी संयमाचे घाट बाबा असतील, पण त्यातून अश्रूंचे पाठ वाहणारी आई असते. वेलीवर फुलणारी फुले खूप सुंदर पण या वेलीवर फुलणार्‍या प्रत्येक फुलाला जसे देवाच्या मूर्तीवर विराजमान होण्याचा मान मिळत नाही. पण प्रत्येक मनुष्याला, प्राण्याला मात्र त्याच्या आईच्या कुशीत जन्म घेण्याचे  तिच्या मिठीत शिरावयाचं भाग्य मिळत असत.

फु. म. शिंदे यांच्या कवितेचे भाव विश्व उलगडत असताना आईच्या हृद्यातून बाहेर पडणारा बाळ हा शब्द ज्याने ऐकला नाही, माया, ममतेचा हात पाठीवरून कधी फिरला नाही, तिच्या हातचा घास कधी ज्यानंं खाल्ला नाही,  प्रेम दृष्टीला पडलं नाही,  चरणी लोळला नाही,  एवढंच काय आईच्या हातचा मार ज्याने कधी खाल्ला नाही, तो जीव किती अभागी म्हणावा लागेल. असं काहीसं मी मुलांना सांगत होते.
मुलं तल्लीन होऊन ऐकत होते आणि अचानक माझे लक्ष एका शेवटच्या बेंचवर गेलं. तिथे एक मुलगा मात्र अगदी मान खाली घालून बसलेला, डोळ्यातून घळाघळा अश्रूच्या धारा वहात होत्या. बाकीच्या मुलांच्या लक्षात आलं होतचं  पण क्षणाला माझ्या लक्षात यायला उशीर झाला होता. अरे याला आई नाही. चुकलंच माझं. जरा जास्तच स्पष्टीकरण झालं का??? मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला शांत केलं. त्यावेळी मला जाणवलं की, त्याच्या बाजूला बसणारी बरेच विद्यार्थी भावुक झाले होते. आई विषयीच्या भावना, संवेदना आणि त्या मुलाच्या दुःखाची जाणीवही मला प्रत्येकाच्या डोळ्यात दिसत होती.

हाच का तो..मानवी मनातला संवेदनेचा रंग…!
जेव्हा नवरात्रीतल्या नवरंगाची चर्चा होते. तेव्हा माझ्या या मुलांच्या मनातला हा रंग मला हेलावून टाकतो.असा संवेदनशिलतेचा रंग प्रत्येकाच्या हृद्यात असायला हवा तेव्हाच नात्यांची वीण घट्ट होईल असं वाटतं.

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या