Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग जाणिवेचा

नवरंग स्त्री मनातले : रंग जाणिवेचा

नवरात्रोत्सवात दृढ विश्वास घेऊन येते देवी महागौरी,
मयुरता, सद्भावना, सुंदरता अन् समृद्धीचे प्रतिक शोभते,
सदोदित महागौरी आपणास शुभाशीर्वाद देते.

नवरंगी भावभावनांचं मिश्रण असतं स्त्री मन. म्हणून तर जशी वेळ तसे स्वभाव बदलतात. त्या आणि आयुष्याशी तडजोड करतात. असाच एक प्रसंग. काल आमच्या कॉलनीतल्या बायकांची (अर्थात आम्ही सर्व सख्या) भिशी होती. रुपाली सोडून आम्ही सर्वजणी होतो. ती गेल्या सहा महिन्यांपासून आलीच नव्हती. मात्र जेव्हा भिशीला सुरुवात केली तेव्हा पहिला नंबर तिनेचं घेतला होता. पण त्यानंतर आठ दिवसातचं तिच्याकडे मोठा प्रॉब्लेम झालेला. वडील आजारी तेव्हा माहेरी आर्थिक मदत करावी लागली. त्यानंतर दुसर्‍या आठवड्यात मिस्टरांची कंपनी बंद पडली.

- Advertisement -

कर्जाचे हप्ते, त्यासाठी जप्ती, असं बरचं काही घडून गेले. त्यामुळे थोडी बदनामी वगैरे म्हणून दोघे उभयंता घराला कुलूप लावून कुणालाही न सांगता रात्रीचेचं निघून गेले. त्यामुळे आंम्हा सर्व मैत्रिणींना  काळजी वाटू लागली. आपले 40 हजार बुडणार, सगळ्यांनी रुपाला फोन केले कुठे गेली.?  काय झालं.? पण कसलाच थांगपत्ता लागला नाही. सर्वजणी माझ्या घरी येऊन खूप बडबड करू लागल्या. मलाही रुपाचा रागच आला. किमान कुणाला तरी सांगून जायचं, असं वाटलं. प्रत्येक महिन्याला भिशीचा नंबर काढताना प्रत्येकजण तिला कोसत, काही बाही बोलत, नाव ठेवीत. आज त्या गोष्टीला सहा महिने झाले होते. कालही सर्वांनी खूप बडबड केली होती, मी सुद्धा. पण आज सकाळी अचानक काहीही कल्पना न देता ती माझ्या घरी आली. मी ही तिच्याशी जरा आढेवेढे घेतच बोलले. पाहिजे तितके आस्थेने चौकशी केली नाही, ती जरा शांतच होती. थोड्या वेळाने मी तिच्यासाठी चहा ठेवण्यासाठी किचनमध्ये गेले, तिला पाणी दिलं. ती घटाघट पाणी प्याली. मी चहा आणायला आत गेले. चहा घेऊन येते तर काय? ती गायब. पुन्हा मला राग आला. तेवढ्यात माझी नजर समोरच्या टिपॉयकडे गेली. टिपॉयवर एक पाकीट ठेवलेलं होतं आणि त्यावर एक चिठ्ठी ठेवलेली होती. मी अगोदर पाकीट उघडून पाहिलं तर काय.? त्यात आमचे सर्व चाळीस हजार रुपये व्याजासकट परत केलेले. आणि त्या चिठ्ठीत आतापर्यंत तिच्यावर ओढवलेल्या सर्व प्रसंगाबद्दल तिने लिहिलेलं होतं.
 

मी तशीच तिला शोधत बाहेर आले तर बाहेर ती कुठेच दिसेना. मग सगळ्या मैत्रिणींना फोन करून बोलावून घेतलं. सगळ्यांना चिठ्ठी वाचून आणि पैसे पाहून खूप वाईट वाटत होतं. आपण उगीचच तिला नाव ठेवले. काही बोललो याचा प्रत्येकजण पश्चाताप करत होते. हे सर्व पैसे तिला परत करायचे, तिची माफी मागायची, तिला या संकटातून बाहेर काढायचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला. दसर्‍यानंतर तिचा शोध घ्यायचा, तिच्या मिस्टरांचा गेलेला जॉब मिळवून द्यायचा, तिलाही कुठेतरी जॉब शोधून द्यायचा, असं बरंच प्लॅनिंग करून झालं. बहुतेकांच्या डोळ्यात पाणी होते, कुणी हळहळत होतं. उगीचच तिला नावं ठेवली म्हणून स्वतःला दोष देत होत. कुणी तिची मनोमन क्षमा मागत होतं. हे सगळं पाहून मला आश्चर्य वाटलं. आज माझ्या सख्यांच्या मनातले वेगवेगळे रंग मला दिसतं होते. सर्व भावभावनांचं   मिश्रण इथे पहायला मिळत होतं. हाच होता आमच्यासाठी आठव्या माळेचा रंग. परिस्थितीची जुळवून घेणारा. जाणिवेचा रंग.!

 – सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर.

- Advertisment -

ताज्या बातम्या