Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याNcp Crisis : अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला,...

Ncp Crisis : अजित पवार गटाचे सगळे आमदार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, राजकीय तर्कवितर्कांना उधाण

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अधिवेशनाच्या दिवशी घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार अचानक आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी यशवंत चव्हाण सेंटरवर पोहोचले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. रविवारीच अजित पवार आणि इतर मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. आता त्यानंतर आमदारही भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार हे सिल्व्हर ओकवर आहेत. तिथून ते वायबी चव्हाण सेंटरला निघाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे चव्हाण सेंटरला पोहोचत आहेत. जयंत पाटीलही चव्हाण सेंटरकडे यायला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.

कालदेखील अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाचे नऊ मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांच्या भेटीची वेळ घेतली नव्हती. त्यावेळी काही मिनिटे चर्चा केल्यानंतर अजित पवारांचा गट बाहेर आला होता. या भेटीत अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहण्यासाठी शरद पवारांना आपल्यासोबत सरकारमध्ये सामील होण्याची विनंती केली होती. मात्र, शरद पवार यांनी हा प्रस्ताव नाकारल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहण्यासाठी तुम्ही काहीतरी मार्ग काढा, असेही अजितदादांच्या गटाने म्हटले होते. यावर शरद पवार यांनी कोणताही कौल दिला नव्हता. त्यानंतर पुन्हा एकदा अजितदादांचा गट शरद पवार यांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात त्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या