Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल! राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर...

NCP Crisis : अजित पवारांचे शिंदेंच्या पावलावर पाऊल! राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्हावर निवडणूक आयोगाकडे ठोकला दावा

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या बैठका आज मुंबईत होत आहे. मात्र दोघांपैकी कुणाच्या बैठकीला जायचं, यावरून राष्ट्रवादीचे आमदार चांगलेच कात्रीत सापडले आहेत. अजित पवार यांनी वांद्रे येथील एमईटी कॉलेजमध्ये बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हिप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हिप जारी केला आहे. ‘

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) राजकीय संघर्ष निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दारापर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करणारी अजित पवार यांची याचिका निवडणूक आयोगाला प्राप्त झाली आहे. दुसरीकडे शरद पवार गटातील जयंत पाटील यांनी ९ आमदारांविरुद्ध अपात्रतेची प्रक्रिया सुरू केल्याची याचिकाही आयोगाला प्राप्त झाली आहे. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या दोन दिवस आधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी 30 जून रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा करणारे एक अप्रसिद्ध पत्र देखील आयोगाला प्राप्त झाले आहे, असे निवडणूक आयोगाच्या सूत्राने सांगितले.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने त्यांच्या समर्थनार्थ 40 हून अधिक आमदार आणि खासदारांची शपथपत्रे दाखल केली आहेत. निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले की, शरद पवार गटाने आयोगापुढे याचिका दाखल केली असून, या पक्ष व पक्ष चिन्हाबाबत कोणतेही निर्देश देण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती केली आहे. अजित पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह तेच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांनीही तेच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा करत प्रफुल्ल पटेल आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोग येत्या काही दिवसांत याचिकांवर प्रक्रिया करेल.

राज्याचे राजकारण गेल्या एक वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाने ढवळून निघाले असताना आता राष्ट्रवादी व अजित पवार गटही त्याच मार्गाने चालल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरून निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यासाठी कार्यकर्त्यांची शपथपत्रे, पुरावे आदी देण्यात आले होते. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सध्या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे आहे. तसेच राष्ट्रवादीचे झाले तर अशा चिंतेत कार्यकर्ते आहेत. गेल्या एका वर्षातील घटनाक्रम पुन्हा समोर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या