पुणे | Pune
माजी मंत्री व इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी अखेर तुतारी फुंकली आहे. त्यांनी आज (दि. ७) इंदापुरातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश केला. इंदापूर येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी तुतारी हाती घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग असल्याचा गौप्यस्फोट केला.
इंदापूर येथे आज हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) प्रवेश झाला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील मोहिते, शरद पवार गटाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांच्यासह पक्षातील अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटलांनी जयंत पाटलांचे आभार मानले. पाटील म्हणाले, “जयंतराव आपण १५ वर्षे एकत्र काम केले आहे. आज तुम्ही या पक्षाचे अध्यक्ष आहात आणि मला तुम्ही या पक्षात सहभागी करून घेतले. त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे”. असे पाटील म्हणाले.
हे ही वाचा : Harshavardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांच्या हाती ‘तुतारी’! इंदापूरातून उमेदवारीही जवळपास निश्चित
ते म्हणाले की, खासदार सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे की, त्या चारवेळा खासदार झाल्या आहेत. यात आमचा तीन वेळा प्रत्यक्षपणे सहभाग होता. पण कालच्या लोकसभा निवडणुकीत आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट करताच उपस्थितांनी हासून दाद दिली. सुप्रिया सुळे यांनी तुम्ही पक्षात येण्यासाठी आणि एकत्र काम करण्यासाठी विश्वास दाखवला. त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो.
हर्षवर्धन पाटील पुढे असे ही म्हणाले, आपण कधीच व्यक्तिगत निर्णय घेत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. तुम्ही हातात तुतारी घ्या असा आग्रह शरद पवार यांचा होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला. शरद पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. काही पदरात पाडून घेण्यासाठी नाही, १० वर्षात कुठल्याच संवैधावनिक पदावर नव्हतो. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी टाका ती टाका, दिलेली जबाबदारी पार पडणार आहे. लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे, मी जनतेचे ऐकले, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
सत्य लवकर पटत नाही, पण ते दीर्घकाळ टिकते, ही राजकीय शिकवण आपल्याला मिळाली आहे. लोकशाहीत जनता श्रेष्ठ आहे, त्यामुळे जनतेने दिलेला आवाज मी ऐकला. २०१९ ला जनतेचा विचारानेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णयाची कल्पना दिली आहे. जनतेचा निर्णय मला स्वीकारावा लागेल, ही कल्पना देऊनच मी हा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचे भेटणे किंवा बोलणे व्हायचे, आम्ही फोनवर बोलायचो तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबला आहात, त्याऐवजी इकडे या. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. त्यानुसार आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) आलो आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा