मुंबई । Mumbai
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीटमधील पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर (Modi Govt) टीका करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे याचे राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत. आता याच प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी म्हटलं आहे की, नरेंद्र मोदीजी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतीकारी गोष्टी घडल्याही आहेत. पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे.
हे ही वाचा : पुणे जिल्ह्यात पुन्हा ‘हिट अँड रन’! आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले
अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी, मात्र केंद्र शासनाला सर्व काही स्वतःच्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत. या अनागोंदीमुळे उद्विग्न उद्या काही तरुण तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असा इशाराही पाटील यांनी दिला.
दरम्यान नीट पेपरफुटीप्रकरणी प्रकरणावरून आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील मोदी सरकारवर टीका केली आहे. वन नेशन, वन इलेक्शन म्हणणाऱ्यांना एक परीक्षा नीट घेता येत नसल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. मागील दोन वर्षात महाराष्ट्रात तर लूट झाली आहे. देशात नीटचा प्रश्न असो किंवा नेटचा प्रश्न असो किंवा सीईटीचा विषय असो, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पण आजच्या स्थितीला भाजपा केवळ कोण कोणत्या जाती-धर्माचा आहे, याबाबत चर्चा करताना पाहायला मिळत आहेत. पण आजची तरुण पिढी ज्या समस्येला सामोरे जात आहे, त्यावर कोणीही चर्चा करण्यास तयार नाही. परीक्षेच्या मुद्द्यावर चर्चा करायला हवी, त्यामुळे आपण सर्वांनी च्या मुद्द्यावर चर्चा करूया, असे आदित्य ठाकरे यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
हे देखील वाचा : “महायुतीत अजितदादांचं खच्चीकरण, त्यांनी आंबेडकरांसोबत…”; NCP नेत्याचं खळबळजनक विधान
दरम्यान NEET-UG 2024 आणि UGC-NET सारख्या प्रवेश परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या देशव्यापी वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सध्याचे महासंचालक सुबोध सिंग यांच्या जागी वरिष्ठ अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे नवीन प्रमुख म्हणून शनिवारी नियुक्ती केली. खरोला हे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) चे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्याकडे आता एनटीएचे नवीन संचालकाची नियुक्ती होईपर्यंत NTA चे नेतृत्व करण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हे देखील वाचा : पावसाच्या खंडामुळे धाकधूक वाढली; खरीप हंगामाच्या किती हेक्टरवर पेरण्या पूर्ण?