मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बंडानंतर १७ जुलै अर्थात आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात राजकीय चिखलफेक पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.सोमवारी सकाळी १०.१५ मिनिटांनी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या मिनिटातच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला मारून त्याचा प्रत्यय आणून दिला. त्यामुळे येत्या पंधरवड्यात या दोन दिग्गज आमदार चांगलीच खडाजंगी होणार असल्याचे समोर येत आहे.
विधानसभेच्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे सभागृहाचं कामकाज सुरू होताच विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्या मंत्र्यांचा परिचय करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जागेवर उभं राहात नव्या मंत्र्यांची माहिती सभागृहाला द्यायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी पहिलंच नाव अजित पवार यांचं घेतल्यामुळे त्यावर विरोधी बाकांवरून काहीतरी प्रतिक्रिया येणार असा अंदाज होता. झालंही तसंच. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करून देताना “उपमुख्यमंत्री व वित्त” असा उल्लेख केला आणि ते थांबले. त्यांनी पलीकडच्या बाकावर बसलेल्या अजित पवारांकडे पाहिलं. हे पाहून बाजूलाच बसलेल्या देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना “नाव सांगा”, असं म्हटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचं नाव घेतलं. यानंतर अजित पवारांनी उभं राहात सगळ्यांना नमस्कार करून अभिवादन केलं. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किल शब्दांत टोला लगावला. “त्यांची-आमची जुनी ओळख आहे”, असं जयंत पाटील म्हणताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. तशीच ती अजित पवारांच्या चेहऱ्यावरही दिसून आली!
Earthquake : अमेरिकेच्या अलास्कात शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा Alert जारी
मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं नाव घेण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उल्लेख करताच अजित पवारांनी सभागृहाला नमस्कार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर संजय बनसोडे, आदिती तटकरे, अनिल पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि धर्मरावबाबा आत्राम या नव्या मंत्र्यांचा देखील परिचय मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला करून दिला आहे.
पोहण्याचा मोह आला अंगलट! मार्वे बीचवर ५ शाळकरी मुलं बुडाली