Monday, February 2, 2026
HomeराजकीयSunil Tatkare : सुनील तटकरेंच्या वक्तव्याने राष्ट्रवादी विलीनीकरणाचा सस्पेन्स वाढवला; म्हणाले…

Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या वक्तव्याने राष्ट्रवादी विलीनीकरणाचा सस्पेन्स वाढवला; म्हणाले…

मुंबई । Mumbai

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे विलिनीकरणाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

- Advertisement -

नुकताच राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील ‘प्रीती संगम’ या समाधीस्थळाला भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सुनील तटकरे त्यांच्यासोबत होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाले की, “यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा आणि अजितदादांनी दिलेला विकासाचा विचार पुढे नेण्याच्या भावनेतून सुनेत्रा पवार येथे आल्या आहेत. आगामी काळात महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी त्या मोठे योगदान देतील.”

YouTube video player

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावर विचारले असता, सुनील तटकरे यांनी थेट उत्तर न देता अत्यंत सूचक भूमिका मांडली. “आम्ही सध्या एनडीएचे घटक आहोत आणि सत्तेत सहभागी आहोत. एनडीएच्या विचारांशी जे सुसंगत आहेत आणि ज्यांना एनडीएत यायचे आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतरच यावर अधिक स्पष्टता येईल,” असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार गटाकडे असल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांनी एनडीएमध्ये सामील होण्याचा जो निर्णय घेतला होता, त्यावर राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाने शिक्कामोर्तब केले आहे. संजय राऊत यांच्यासारखे नेते टीका करत असले तरी, त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना तटकरे म्हणाले की, “नेमकं कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात विलीनीकरण होणार, याचा खुलासा आधी व्हायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक मजबूत पक्ष असून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढवल्या आहेत. पक्ष म्हणून आमचा नेता निवडण्याचा अधिकार निवडून आलेल्या सदस्यांचा आहे.” भाजपसोबतच्या संबंधांवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप हा मोठा पक्ष असला तरी राष्ट्रवादीने नेहमीच आपले निर्णय स्वतंत्रपणे घेतले आहेत. भाजपने आम्हाला कधीही निर्णय घेण्यासाठी दबाव टाकलेला नाही, असे सांगत त्यांनी पक्षाच्या स्वाभिमानाची आठवण करून दिली.

शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत दिलेल्या भावनिक प्रतिक्रियेवर तटकरे यांनी सावध भूमिका घेतली. त्याबाबत अधिक माहिती मिळाल्यावरच आपण भाष्य करू शकू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी, पक्ष एकजूट असून एनडीएसोबतच राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणावरून येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकी कोणती हालचाल होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

विजय

Vijay Wadettiwar: “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणून हा कट शिजला”;...

0
मुंबई | Mumbaiराज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन प्रचंड राजकारण रंगले आहे. अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे...