मुंबई | Mumbi
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सुत्रे ही सुनेत्रा पवारांच्या हाती देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचीच एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठा नाट्य घडल्याचे पाहायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेलं एक पत्र व्हायरल झालं असून, या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावंच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे मोठा गोंधळ झाला असून याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या गोंधळाबाबत स्वतः सुनेत्रा पवारांनी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे.
याआधी, नवनिर्वाचित पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दहा मार्च रोजी दिलेल्या पत्रात प्रफुल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख केला नसल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. त्यावर पक्षाकडून कुठले स्पष्टीकरणही देण्यात आलेले नव्हते. परंतू 29 एप्रिल 2026 रोजीचे हे पत्र आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हा नेमका गोंधळ काय? खरंच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पटेल, तटकरे आणि भुजबळ, वळसे पाटील या नेत्यांना हटवण्यात आले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच या पत्रातील यादीमध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावासमोर सरचिटणीस या पदाचा उल्लेख आहे.
सुनेत्रा पवारांची पोस्ट
या गोंधळामध्ये यादीमध्ये तांत्रिक आणि क्लेरिकल चुका असून या दुरुस्त केल्या जातील, असे सुनेत्रा पवारांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. सुनेत्रा पवारांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, “प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक लेखनिक चूक असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल.”
केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांची नावे तर नाहीत. परंतु, खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जे यांचे नाव लिहिण्यात आले आहे. त्याशिवाय, पार्थ पवार, सुबोध मोहिते, जय पवार, अविनाश अडिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, रमन प्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि अभिषेक बोके यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नावांचा समावेश करण्यात येतो की नाही आणि त्यांच्याकडे कोणते पद सोपवण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





