Wednesday, December 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Elections 2024: कुणीतरी मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर…; राज ठाकरेंच्या...

Maharashtra Assembly Elections 2024: कुणीतरी मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर…; राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवारांची खोचक टीका

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा, बैठकांना वेग येत आहे. विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. दरम्यान राज ठाकरेंनीही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. प्रचारसभांच्या दरम्यान राज ठाकरे हे सातत्याने शरद पवारांनी जातीयवाद पसरवला, फोडाफोडी केली हे म्हणत आहेत. याबाबत विचारलं असता शरद पवारांनी राज ठाकरे मूर्खासारखे बोलतात म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे.

राज ठाकरे शरद पवारांबाबत काय म्हणाले?
राज ठाकरेंनी शरद पवारांवर जातीयवाद पसरवला, पक्ष फोडले असा सतत आरोप केला आहेत. शरद पवारांच्या जातीयवादाचे अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकी एक सांगतो. पुण्यात एका कार्यक्रमात शरद पवारांना लोकमान्य टिळकांची पुणेरी पगडी घालण्यात आली. मात्र, त्यांनी ती काढली आणि ज्योतिबा फुले यांची पगडी घातली. खरे तर ती पगडी घालण्याला माझा विरोध नाही. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घालत जा,असे म्हणणे याला माझा विरोध आहे. हा एकप्रकारे जातीयवाद आहे, असे राज ठाकरे म्हणाले होते. तसेच शरद पवार यांना वयानुसार काही गोष्टी आठवत नसतील. मी केलेल्या अनेक गोष्टींचे पुस्तक त्यांना पाठवतो. त्यानंतर त्यांना कळेल की, ते कोणत्या गोष्टी विसरले आहेत. असेही राज ठाकरे म्हणाले. याबाबत विचारले असता शरद पवारांनी राज ठाकरे मूर्खासारखे काहीही बोलत आहेत असे म्हणत टीका केली आहे.

- Advertisement -

काय म्हणाले शरद पवार?
कुणीतरी मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर त्याची नोंद कशासाठी घ्यायची? माझ्या नेतृत्वात जो पक्ष चालत होता, कधी काळी शासनही चालत होते. त्यावेळचे निर्णय बघा. आम्ही कुणाला प्रोत्साहन दिले. आमच्या पक्षामध्ये विधिमंडळात नेतृत्व करायची निवड करायची आली होती तेव्हा आम्ही कुणाला निवडले ते बघा. मधुकर पिचड यांना नेता बनवले. छगन भुजबळ यांना नेता बनवले. २५ लोकांची यादी देऊ शकतो की, जे विविध जाती-जमातीचे होते. आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्यांची नेमणूक आम्ही केली होती. आमची भूमिका कायम व्यापकच होती. राज ठाकरे नावाचे गृहस्थ जे काही बोलत आहेत त्याला आधार काय आहे मला माहिती नाही. काहीही ठोकून द्यायचे. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे बाबा. त्यामुळेच आरोप करत असावेत, असा पलटवार शरद पवार यांनी केला.

यापुढे शरद पवार म्हणाले, पुणेरी पगडीबाबत जे काही राज ठाकरे बोलले तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात महात्मा फुलेंची पगडी मलाही घालण्यात आली. मी जरी म्हटले की ही टोपी घाला, फुले पगडी वापरा त्याचा आनंद आहे तर मी जातीयवादी कसा? महात्मा फुलेंनी कधीही जातीयवाद केला नाही. आमच्यासाठी महात्मा फुले, त्यांचा विचार आम्ही अंगिकारतो. लगेच आम्हाला जातीयवादी कसे काय म्हणायचे? याला काही फारसा अर्थ नाही. असेही शरद पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या