मुंबई | Mumbai
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आता जागावाटप, मतदारसंघ, उमेदवार चाचपणी यांना वेग आला आहे. अशातच महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या जागावाटपाबाबत सातत्याने चर्चा करत आहेत. काही जागांचा तिढा सुटला आहे, तर काही जागांवर अद्याप चर्चा सुरू आहेत अशी माहिती सातत्याने समोर येते. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार “महाविकास आघाडीत २८८ पैकी २०० जागांवर एकमत झाले. उर्वरित जागांसाठी आज बैठक होईल. बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहतील. निर्णय घेतील, आम्हाला सांगतिले” असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत शरद पवारांनी मोठे विधान केले आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, महाविकास आघाडीतील पक्षांसोबत आज बैठक आहे. त्या बैठकीला तिन्ही पक्षांचे अध्यक्ष हजर राहणार आहेत. त्यानंतर आज निर्णय घेवून संध्याकाळपर्यंत सांगतील असेही शरद पवार म्हणालेत. शरद पवार यांनी यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेसाठी जागांचा निर्णय जयंत पाटील घेतील. जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. जयंत पाटील पक्षाचे अध्यक्ष आहेत, कालच बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाईल असे म्हटले होते.
जयंत पाटलांची प्रतिक्रिया
शरद पवार तुमच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगत आहेत याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच. जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायच्या आहेत. त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे. किती जागा मागितल्या या प्रश्नावर, तुम्हाला सांगण्यापेक्षा मित्र पक्षांना सांगतो असे ते म्हणालेत. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही. आमच्याकडे तरुण चेहरे आहेत. मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा असे उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे, असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.
निकालानंतर बोलणं योग्य राहील
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाबाबत काही नेते दावा करत आहेत. मविआत शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचा आग्रह आहे, त्यावर शरद पवार बोलले की, “आमच्या तिघांची पत्रकार परिषद झाल्यानंतर हा विषय संपला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाबाबत बोलण योग्य राहील”.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा