दिल्ली | वृत्तसंस्था
२१ जुलैला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. उपराष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारासाठी भाजपच्या संसदीय मंडळाची एक महत्त्वपूर्व बैठक आज सायंकाळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. एनडीए कडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी मतमोजणीही होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. २५ ऑगस्टपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.
आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.




