Thursday, May 2, 2024
Homeनाशिकभगूर-देवळालीसाठी कोविड सेंटरची गरज

भगूर-देवळालीसाठी कोविड सेंटरची गरज

देवळाली कॅम्प । Deolali Camp (वार्ताहर)

वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कॅन्टोन्मेंट रुग्णालयात उभारण्यात आलेले कोविड सेंटर अपुरे पडत आहे. त्यामुळे कोविड रुग्णांकरिता मंगल कार्यालय प्रशासनाला देण्याची तयारी पाळदे कुंटूंबियांनी दाखवल्याने जिल्हा प्रशासनाकडे कोविड सेंटर उभारण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -

देवळाली कँम्प परिसरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेकांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. देवळाली कँम्प व पंचक्रोशीतील दोनशेपेक्षा जास्त रुग्ण नाशिक, नाशिकरोडसह ठिकठिकाणी उपचार घेत आहेत.

कोविड रुग्णांनी कॅन्टोन्मेंट दवाखान्याबाबत विचारणा केल्यानंतर जागा नसल्याने घरी अथवा अन्यत्र राहण्याची सुचना देण्यात येतात. भगूर लहवित रोडवर अष्टविनायक लॉन्स असून जवळ कोणतीही नागरी वस्ती नाही.

दोन एकरांपैकी तीस गुंठ्यांवर असलेल्या मोठ्या शेडमध्ये शंभर रुग्णांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. देवळाली कँम्पसह भगूर, लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, राहुरी, दोनवाडे, संसरी, शेवगेदारणा, बेलतगव्हाण आदि गावांना जोडणार्‍या मुख्य रस्त्यावर सदरचे लॉन्स असल्याने रुग्णांच्या घरातील सदस्यासह आरोग्य प्रशासनाला सोयीस्कर ठरणार आहे.

वाहतुकीसाठी दळण वळणाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकत असल्याने अष्टविनायक लॉन्स कोविड सेंटरसाठी घ्यावे, याकरिता जिल्हा प्रशासनाला पत्र देणार असल्याचे संचालक वैभव पाळदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने देवळालीसह पंचक्रोशीकरिता शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारणे गरजेचे आहे.

शासनाच्या आरोग्य विभागाला याबाबत पूर्वीच मागणी केली असून अष्टविनायक लॉन्स येथे तातडीने सेंटर उभारावे याकरिता मुख्यमंत्र्यांशी फोन करून मागणी केल्याचे माजी आमदार योगेश घोलप यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या