Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखमहिलांवरील हिंसाचाराविरोधात एकजुटीची गरज

महिलांवरील हिंसाचाराविरोधात एकजुटीची गरज

कालपासून महिला हिंसाचार निर्मूलन जनजागृती दिवस जगभर साजरा करण्यास सुरुवात झाली. हा दिवस 1981 सालापासून साजरा केला जातो. यानिमित्त दरवर्षी 25 नोव्हेंबरपासून आगामी 15 दिवस वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. ‘महिला आणि मुलींवरील हिंसाचाराच्या विरोधात एकजूट’ ही यावर्षीची या दिवसाची संकल्पना आहे. महिला आणि मुलींवरील हिंसाचारावर जनजागृती करण्यासाठी एक दिवस साजरा करण्याची वेळ जगावर आली यातूनच या विषयाचे गांभिर्य आणि त्यावर सखोल विचार करण्याची गरज स्पष्ट होते. या मुद्याला धरुन अनेक संस्था सर्वेक्षण करतात. संस्था वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा निष्कर्ष मात्र एकच आढळतो. तो म्हणजे महिलांवरील हिंसाचार दिवसेदिवस वाढतच आहे. त्याला देशातील कोणतेही राज्य दुदैर्वाने अपवाद नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील निष्कर्षानुसार महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा देशात पाचवा क्रमांक आहे. गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांच्या प्रमाणात साधारणत: पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही नोंदवल्या गेलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आहे. न नोंदवल्या गेलेल्या घटनांची आणि प्रसंगांची आकडेवारी कदाचित यापेक्षा नक्कीच जास्त असू शकेल. कारण असे प्रसंग सहन करण्याकडेच महिलांचा कल आढळतो.

किंबहुना आपल्यावर अन्याय होतो याची जाणीव किती महिलांना असते? त्याविरोधात गुन्हा नोेंदवणे ही फार पुढची पायरी आहे. मुळात सहनशीलता हाच उत्तम गूण असल्याचे मुलींच्या मनावर त्यांच्या नकळत्या वयापासून बिंबवले जाते. आयुष्यभर त्यांनी सहनशीलच असावे अशीच त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते. महिलांना मारहाण केली जाते. त्यांच्यावर बलात्कार होतात. त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकले जाते. प्रेम करण्याला विरोध करणार्‍या मुलींची दिवसाढवळ्या हत्या केली जाते. त्यांना काळी जादू करणारी चेटकीण ठरवून गावाबाहेर हाकलले जाते. जात पंचायती अमानूष शिक्षा सुनावतात. गुन्हा कितीही गंभीर असला तरी महिलांनी त्याविरोधात दाद मागू नये अशीच त्यांच्या कुटुंबियांची अपेक्षा असते. नव्हे समाजही तेच अपेक्षिताना आढळतो. महिलांसंदर्भातील परंपरांना आणि नियमांना विरोध करणार्‍या महिलांची संभावना ‘अती शहाणी’ अशी केली जाते. महाराष्ट्रातील साधारणत: 50 टक्के महिलांना नवर्‍याने त्यांना मारहाण करण्यात काहीच गैर वाटत नाही.

- Advertisement -

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालात तसा निष्कर्ष नमूद आहे. अन्याय झाल्याची जाणीव झाली तर दाद मागितली जाऊ शकते. ती जाणीवच नसेल तर? याच मानसिकतेविरोधात जनजागृती करण्याची खरी आवश्यकता आहे. त्याचबरोबरीने कायदा साक्षरताही रुजवण्याची गरज आहे. महिला अन्याय आणि हिंसाचाराविरोधात सरकारने कायदे संमत केले आहेत. त्या कायद्यातील तरतूदींविषयी देखील महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. समाजानेही त्यांचा माणूस म्हणून विचार करायला हवा. महिला हिंसाचार निर्मूलन जनजागृती करण्यासाठी आणि हिंसाचाराविरोधात दाद मागण्यासाठी समाजाची एकजूटही तितकीच महत्वाची आहे. एकीचे बळ असले की त्याचे फळही चांगले आणि सर्वांना मिळते. महिला हिंसाचार निर्मूलन जनजागृती दिवस साजरा करताना त्यामागील मर्ग लक्षात घेतले तर बरे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या