नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi
वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) उद्या, रविवार (२१ जून) रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांनंतर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) यांनी यापूर्वीची परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. या फेरपरीक्षेसाठी देशभरातील सुमारे २२ लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
फेरपरीक्षा दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत ऑफलाइन (पेन आणि पेपर) पद्धतीने घेतली जाणार असून, यावेळी विद्यार्थ्यांना १५ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, बायोमेट्रिक पडताळणी, सीसीटीव्ही देखरेख, एआय-आधारित निरीक्षण आणि बहुस्तरीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, वैध फोटो ओळखपत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्मार्ट घड्याळ, मोबाईल फोन, ब्लूटूथ डिव्हाइस तसेच इतर कोणतीही प्रतिबंधित सामग्री परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही फेरपरीक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, नागपूरमधील एका विद्यार्थ्याला चुकून अबूधाबी येथील परीक्षा केंद्राचे वाटप झाल्याचा प्रकार समोर आल्याने NTA च्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेनंतर परीक्षा केंद्र वाटप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.




