दिल्ली । Delhi
नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असून, सरकारने देशातील सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे हे आंदोलन सुरू झाले. या वाढत्या हिंसाचारामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी देश सोडला आहे. त्यानंतर नेपाळच्या लष्कराने देशाची सूत्रे हाती घेतली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.
नेपाळ सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील ‘जेन जी’ (Gen Z) निदर्शने सुरू झाली. हे आंदोलन केवळ सोशल मीडियावरील बंदीपुरते मर्यादित न राहता, भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांबद्दलच्या उदासीनतेबद्दल ओली सरकार आणि राजकीय नेत्यांवरील रोष व्यक्त करणारे एक मोठे अभियान बनले.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी, संतप्त निदर्शकांनी अनेक सरकारी इमारतींवर हल्ले केले. यामध्ये संसद भवन आणि अनेक वरिष्ठ नेत्यांच्या घरांना आग लावण्यात आली. पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिल्यानंतरही हिंसाचार थांबला नाही. राष्ट्रपती पौडेल यांनी शांतता आणि राष्ट्रीय एकतेचे आवाहन केले. “देशातील कठीण परिस्थिती शांततेने सोडवण्यासाठी मी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करतो,” असे ते म्हणाले.
सोमवार आणि मंगळवारी नेपाळमध्ये घडलेल्या घटना इतिहासात नोंद घेण्यासारख्या आहेत. आंदोलकांनी अनेक मंत्र्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. देशातील तीन प्रमुख तुरुंगांमधून कैदी पळून गेले. आंदोलकांनी माजी गृहमंत्री रवी लामिछाने यांची काठमांडूच्या नाखू तुरुंगातून सुटका केली. सोशल मीडियावरील बंदी सोमवार रात्री उशिरा उठवण्यात आली असली, तरी मंगळवारीही देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू होता. लष्कराकडून नागरिकांना हिंसाचार थांबवण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे.
नेपाळमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि काठमांडू दरम्यानची अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया, इंडिगो आणि नेपाळ एअरलाइन्सनेही आपली उड्डाणे रद्द केली. आंदोलकांनी सरकारी इमारती जाळल्यानंतर, लष्कराने मुख्य सचिवालय इमारती, सिंह दरबारवर नियंत्रण मिळवले. आंदोलकांना पांगवून लष्कराने संपूर्ण संकुलाचा ताबा घेतला. तसेच, आंदोलकांच्या एका गटाने पशुपतिनाथ मंदिराच्या प्रवेशद्वाराची तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लष्कराने हस्तक्षेप करून त्यांना रोखले. नेपाळमध्ये आता अंतरिम सरकारसाठी नव्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, पण परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.




