नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सोशल मीडियावरील बंदीविरोधात नेपाळमध्ये Gen Z आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे. या आंदोलनामुळे नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचे संकट उभे राहिले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता कृषी मंत्री, आरोग्य मंत्री यांनीही राजीनामे दिले आहेत. इतकेच नाही तर आंदोलकांनी उग्र अवतार घेत थेट संसद भवन पेटवून दिले आहे तर राष्ट्रपती भवनावर आक्रमण केले आहे. तर दुसरीकडे नेपाळमधील बीरगंज इथे नेपाळ सरकारचे कायदेमंत्री अजय कुमार चौरसिया यांचे घर आंदोलकांनी पेटवून दिले. नेपाळमधील या आक्रमक आंदोलनानंतर मोठा हिंसाचार उफाळला आहे. यामध्ये आतापर्यंत २५ पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.
नेपाळमधील आंदोलनामुळे तेथील सरकार कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आत्तपर्यंत ९ जणांनी राजीनामे दिले आहे. सरकारची भूमिका लोकशाहीची नसून हुकुमशाहीची असल्याचा दावा या नेत्यांनी करत सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांमध्ये कृषी, शिक्षण मंत्री , आरोग्य मंत्री आणि माहिती प्रसारण मंत्र्यांचा समावेश आहे. नागरिकांचा आवाज दाबला जाऊ शकत नाही, लोकशाहीवर निर्बंध आणले जाऊ शकत नाही असे या मंत्र्यांचे म्हणणे आहे.
मंगळवारी सकाळी नेपाळमध्ये ललितपूर येथे माहिती प्रसारण मंत्री पृथ्वी सुब्बा गुरुंग यांच्या घराला आग लावण्यात आली. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी आधी मंत्र्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली, आग लावण्याची घटना घडली. मात्र प्रशासनाने परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. युवकांच्या आंदोलनानंतर नेपाळचे गृहमंत्री यांनी राजीनामा दिला, मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी त्यांच्याही घराला आग लावली. सोशल मीडियावर बंदीचा निर्णय आणि त्यानंतर झालेल्या हिंसक आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार मोठ्या संकटात सापडले आहे. सत्ताधारी आघाडीत सहभागी नेपाळी काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे.
नेपाळमध्ये इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा प्रचंड वापर
नेपाळमध्ये इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा प्रचंड वापर होतो. तेथील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ऑनलाईन असल्याची आकडेवारी आहे. नेपाळच्या लोकसंख्येत १६ ते २५ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण २०.८ टक्के आहे. विशेषत: फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप या समाजमाध्यांचा ते भरपूर प्रमाणात वापर करतात. त्याबरोबरच एक्स, रेडइट, लिंक्डइन, पिंटरेस्ट, सिग्नल, वीचॅट यांच्यासह २६ समाजमाध्यमांवर बंदी आल्यामुळे या तरुणांच्या थेट दैनंदिन जीवनावरच परिणाम झाला आणि ते संतप्त झाले. टिकटॉकने सरकारी नियमनांचे पालन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी नाही.
नेपाळमध्ये सोशल मिडियावरील बंदीविरोधात युवक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाने हिंसक वळण घेतले, ठिकठिकाणी तोडफोड, जाळपोळीचे प्रकार घडले. त्यात नेपाळ पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, गोळीबारी केली, पाण्याचे फवारे वापरले. सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने सरकारची झोप उडवली. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांविरोधात सरकारने कठोर भूमिका घेतली. आम्ही झुकणार नाही असे पंतप्रधान म्हणाले, परंतु रात्री उशिरा सरकारने सोशल मीडियावरील बंदी उठवली मात्र आता आंदोलनकर्त्यांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
के. पी. ओलींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक
नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी संध्याकाळी सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितले, “मी सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन करून त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित पक्षांशी संवाद साधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी ६ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




