नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरूणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये. यावेळी शेकडो Gen Z युवक नेपाळी संसदेत घुसले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवर सुद्धा फायरिंग केली. नेपाळ पोलिसांनी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ कर्फ्यू लावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप सह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरूणांनी आंदोलन केले. धक्कादायक म्हणजे ५ आंदोलनकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये हजारो Gen-Z मुले-मुली सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आज आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पाण्याची फवारणीही केली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही समोर येत आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलावली आहे. त्याचवेळी, पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री १० वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केला आहे. काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांच्या मते, १२ हजारांहून अधिक आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक १ आणि २ वर ताब्यात घेतला.
…तेव्हाच ही बंदी उठवली जाईल
नेपाळ सरकारचे म्हणणे आहे की, या कंपन्या नेपाळमध्ये त्यांचे कार्यालये उघडतील, सरकारकडे नोंदणी करतील, तक्रारी ऐकण्यासाठी लोकांची नियुक्ती करतील, तेव्हाच ही बंदी उठवली जाईल. टिकटॉक आणि व्हायबरने सरकारच्या सूचनांचे पालन केले, म्हणून त्यांच्यावर बंदी घातली नाही.
नेपाळ सरकारने नोंदणीसाठी सात दिवसांची मुदती दिली होती, मात्र कंपन्यांनी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंदीचा निर्णय घेण्यात आला. मात्र, हा निर्णय देशातील हजारो Gen-Z तरुणांना आवडलेला नाही. राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर आज मोठ्या प्रमाणात तरुणांनी निदर्शने केली. सरकारविरोधात घोषणा देण्यासोबतच निदर्शकांनी नेपाळच्या संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. हे पाहून पोलिसांना अश्रुधुर, पाण्याचा फवारा आणि हवेत गोळीबार करावा लागला.
या प्लॅटफॉर्मवर बंदी
फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप, यूट्यूब, स्नॅपचॅट आणि पिंटरेस्ट, लिंक्डइन, एक्स (पूर्वी ट्विटर) आणि रेडिट, डिस्कॉर्ड, सिग्नल, थ्रेड्स, वीचॅट, क्वोरा, टम्बलर, क्लबहाऊस, मास्टोडॉन, रंबल, मीवी, व्हीके, लाइन, इमो, झालो, सोल, बोटिम आणि हॅम्रो पॅट्रो, ऑनलाइन फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या चिंतेमुळे जुलै २०२५ मध्ये टेलिग्रामवर देखील बंदी घालण्यात आली होती.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




