Thursday, May 2, 2024
Homeनगरहवामान आधारीत फळ पिक विमा योजनेचे नविन निकष जाहीर; 'या' निकषांचा समावेश

हवामान आधारीत फळ पिक विमा योजनेचे नविन निकष जाहीर; ‘या’ निकषांचा समावेश

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

शेतकऱ्यांचा मागील फळ पिक विमा योजनेच्या निकषांना विरोध झाल्याने राज्य सरकारने अखेर हवामान आधारीत फळ पिक विमा योजनेचे नविन निकष बदलले आहेत. निकषांमध्ये सुधारणा करून जास्त पावसाबरोबर कमी पाऊस, पावसाचा खंड अशा नविन निकषांचा समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने वादळ, वारा, पाऊस यामुळे फळबांगाच्या होणाऱ्या नुकसानी पासुन शेतकऱ्यांना संरक्षण व्हावे यासाठी हवामान आधारीत फळबाग विमा योजना आणली आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्यातील जास्त पाऊस या ट्रीगरचा समावेश असल्यामुळे २०१९/२० पर्यत कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्याने या फळ पिक विमा योजनेतुन चांगले परतावे मिळाले होते. मात्र २०२०/२१ मध्ये राज्य सरकारने या निकषांमध्ये बदल केले. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्याचा सरासरी पाऊस हे निकष कमी करून केवळ जास्त पाऊस व आर्द्रता हे निकष टाकले. कमी पावसाच्या भागात ऐवढया मोठया प्रमाणात सलग पाऊस पडणे शक्य नसल्याने गेल्या वर्षीचे फळबांगाचे मोठे नुकसान होवुनही विम्यांचे परतावे मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधुन या योजनेचे निकष बदलण्याची मागणी होत होती.

१८ जुनला शासन निर्णय काढत शासनाने यामध्ये बदल करीत पुढील तिन वर्षासाठी पिक विमा योजना, त्यांचे निकष व विमा कंपन्या जाहीर केल्या आहेत. डाळिंब, पेरू आदी महत्वाच्या फळपिकांच्या परताव्याचे निकष बदलण्यात आले असुन डाळिंबसाठी १५ जुलै ते १५ ऑगस्ट व १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोंबर अशा दोन टप्प्यात पावसाचा खंड हा निकष लावण्यात आला आहे. तर १६ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान जास्त पावसाचा निकष आहे. तसेच पेरू पिकासाठी १५ जुन ते १४ जुलै कमी पाऊस व १५ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड व जास्त तापमान हे निकष लावण्यात आले आहेत. कमी पाऊस, पावसाचा खंड, जास्त तापमान या निकषांमुळे पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना विमे परताव्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. शासनाने नगर जिल्हयासाठी रिलायन्स जनरल इन्शूरंस कंपनी निश्चीत केली असुन या कंपनीच्या माध्यमातुन २०२१/२२ ते २०२३/२४ अशा तीन वर्षासाठी फळपिक विम्यांचे नियोजन केले जाणार आहे.

नवीन निकष

डाळिंब : १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान निकषांप्रमाणे पावसाचा खंड राहील्यास किमान परतावा ५,९०० व कमाल १७,७००, व १६ ऑगस्ट ते १५ आक्टोबर पावसाचा खंड राहील्यास किमान परतावा १७,२०० व कमाल ४१,३०० मिळणार आहे. १६ आक्टोबर ते ३१ डिसेंबर दरम्यान जास्त पावसाचा निकष असुन यामध्ये नुकसान झाल्यास कमाल भरपाई ११,८०० व कमाल ७१ हजार मिळणार आहे.

पेरू : १५ जुन ते १४ जुलै दरम्यान निकषांप्रमाणे कमी पाऊस झाल्यास किमान १२ हजार व कमाल ३० हजार परतावा व १५ जुलै ते १५ ऑगस्ट पावसाचा खंड व जास्त तापमान यामुळे नुकसान झाल्यास किमान बारा हजार व कमाल ३० हजार परतावा देण्यात येणार आहे.

पेरू पिकांसाठी ३० जुन पर्यत मुदतवाढ

नवीन फळ पिक विमा योजना जाहीर झाली आहे. मात्र पेरू, दाक्ष, संत्रा पिकाची विमा भरण्याची मुदत संपली आहे. शासनाने पेरू सह ज्या पिकांची मुदत संपली अशा पिकांना ३० जुन पर्यत पिक विमा भरण्यास मुदत वाढ दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या