शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सरत्या वर्षाला निरोप आणि 2026 या नववर्षाचे स्वागत (New Year Welcome) करण्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी साईनगरीत अलोट गर्दी केली. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज साईनाथ महाराज की जय या जयघोषाने अवघा साईनगरीचा परिसर दणाणून गेला. दोन दिवसात सुमारे तीन लाखाहून अधिक भाविकांनी साईंच्या समाधीचे दर्शन (Sai Baba Darshan) घेऊन नवीन वर्षाचा संकल्प केला.
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत (Shirdi) दिवाळीसारखा उत्साह पाहायला मिळाला. बंगलोर येथील साईभक्त बी. ए. बसवराज यांच्या देणगीतून समाधी मंदिर परिसरात फुलांची मनमोहक सजावट करण्यात आली होती. तसेच साईसमर्थ निलेश नरोडे आणि स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे अवघी साईनगरी (Sai Nagari) झगमगाटात न्हाऊन निघाली होती. हॉटेल, लॉजेस आणि रस्ते दिव्यांच्या माळांनी उजळून निघाले होते. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला जेव्हा नववर्षाचे आगमन झाले, तेव्हा शिर्डीत उत्साहाचे उधाण आले. या मंगलसमयी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan), पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी साई दरबारी हजेरी लावून दर्शन घेतले. साई दरबारी नववर्षाचा श्रीगणेशा अनुभवण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह होता. भाविकांच्या सोयीसाठी रात्री मंदिर दर्शनासाठी उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे रात्रभर दर्शनाच्या रांगा कायम होत्या.
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन (South Superstar Nagarjuna) यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला साईदरबारी हजेरी लावली. वाढती गर्दी लक्षात घेता साई संस्थानने अभूतपूर्व तयारी केली आहे. भाविकांसाठी रात्री उशिरापर्यंत भोजन व्यवस्था आणि रात्रभर अतिरिक्त लाडू प्रसाद काउंटर सुरू ठेवण्यात आले. सुमारे 400 क्विंटल मोतीचूर लाडू आणि 120 क्विंटल बुंदी पाकिटांचे वाटप करण्यात आले. वाढत्या गर्दीसाठी 46 हजार चौरस फुटांचे भव्य मंडप उभारण्यात आले होते. भाविकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा व रुग्णवाहिका तैनात होत्या. जवळपास 53 पालख्यांनी साईदरबारी हजेरी लावली. शहरात ठिकठिकाणी झालेली फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने नववर्षाचे स्वागत अत्यंत आनंदपूर्ण वातावरणात झाले. गर्दीमुळे शिर्डीतील सर्व रस्ते, वाहनतळे आणि निवास व्यवस्था हाऊसफुल्लम झाल्या होत्या. मात्र भक्तीच्या या महाकुंभात प्रत्येक भक्त साईमय झालेला पाहायला मिळाला.





