Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : नेवासा न्यायालयात सुमारे 2500 पानी दोषारोपपत्र दाखल

Ahilyanagar : नेवासा न्यायालयात सुमारे 2500 पानी दोषारोपपत्र दाखल

शनिशिंगणापूर देवस्थान अ‍ॅप प्रकरणात फक्त 77 लाखांचा अपहार उघड

अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अ‍ॅप संदर्भातील अपहार प्रकरणी येथील सायबर पोलिसांनी नेवासा न्यायालयात नऊ संशयित आरोपींविरूध्द सुमारे अडीच हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात सुमारे 77 लाख रूपयांचा अपहार झाल्याचे दोषारोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. भाविकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन अ‍ॅपच्या करारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित आरोपींनी देवस्थानच्या निधीचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून देवस्थानची फसवणूक केल्याचा आरोप दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.

- Advertisement -

शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अ‍ॅपमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार विठ्ठलराव लंघे यांनी या अ‍ॅप करारातील संशयास्पद व्यवहारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या मुद्द्याची गंभीर दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तथापि, कोणताही तक्रारदार पुढे न आल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी तसेच अ‍ॅप मालक यांचे जबाब नोंदविले.

YouTube video player

विविध बँक खात्यांची तपासणी करून अपहारासंदर्भातील कागदोपत्री पुरावे गोळा करण्यात आले. या प्रकरणात सुमारे 500 कोटी रूपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र सखोल तपासानंतर पोलिसांनी दोषारोपपत्रात 77 लाख रूपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. प्रकरण गाजल्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला गती देत देवस्थानचे कर्मचारी संजय पवार व सचिन शेटे यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तपासादरम्यान अ‍ॅप मालकांनी करारानुसार देवस्थानच्या खात्यात जमा करावयाची रक्कम थेट काही कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायबर पोलिसांनी अ‍ॅप मालकांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. या घोटाळ्यात अ‍ॅप मालक, देवस्थानचे अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून एकूण नऊ संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. देवस्थानचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी नितीन शेटे मयत झाले आहे.

नऊ संशयित आरोपींविरूध्द दोषारोपपत्र
अटकेतील संजय तुळशीराम पवार (रा. सोनई), सचिन अशोक शेटे (रा. शनिशिंगणापूर) यांच्यासह नितीन सुर्यभान शेटे (मयत), उज्वल निरंज भट्टाचार्य (पश्चिम बंगाल), वरूण दत्तात्रय पाठक (रा. बनपिंप्री, ता. श्रीगोंदा), विभू जयप्रकाश अग्रवाल (रा. लखनऊ), शालिनी भारत जैयस्वाल (रा. मुंबई), सचिन रावसाहेब बनकर (रा. शनिशिंगणापूर), गोरक्ष केरूजी दरंदले (रा. शनिशिंगणापूर) यांच्याविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

500 कोटींचा दावा अन् प्रत्यक्षात काय ?
शनैश्वर देवस्थानच्या ऑनलाईन दर्शन अ‍ॅप संदर्भातील अपहार हा सुमारे 500 कोटी रूपयांचा असल्याचा आरोप केला जात आहे. अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला त्यावेळी देखील 500 कोटींचा अपहार झाला असल्याचा दावा केला गेला. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रामध्ये 77 लाखांचा अपहार झाल्याचे नमूद केले आहे. नऊ संशयित आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल करताना त्यांच्या बँक खात्यावरील व्यवहार तपासून हा अपहार उघडकीस आणला आहे व तपास करून दोषारोपपत्र दाखल केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर महापालिकेत पक्षातंर्गत सव्वा-सव्वा वर्षाचा फॉम्युला

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या (सोमवार) दिवशी, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीने सत्तेचा स्पष्ट फॉर्म्युला...