पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून घरामधे प्रवेश करून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने असलेली पेटी व रोख दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील निंभारी येथे मंगळवारी रात्री घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कासुबाई बंडू जाधव (वय 52) धंदा-घरकाम,रा. निंभारी, ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, त्या पती बंडू, मुले काशिनाथ, सुनील, अनील, सुना वंदना, राधा, मनीषा व नातवंडासह एकत्र राहतात.
आम्ही मजुरी व शेती काम करून कुटुंबाची उपजिवीका चालवतो. 18 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जेवण करून आम्ही घरातील सर्वजण आमचे राहते घराचे दरवाजाला बाहेरुन कडी लावून झोपी गेलो होतो. त्यानंतर 12 वाजण्याच्या सुमारास माझा मुलगा अनिल जाधव व सून मनीषा हिने मला झोपेतून उठवले तेव्हा आम्हाला दरवाजा उघडा दिसला. तेव्हा आम्ही घरात जाऊन खात्री केली असता आमचे घरातील पेटीमध्ये आम्ही आमचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ठेवलेली होती ती पेटी दिसून आली नाही.
पेटीमध्ये प्रत्येकी एक-एक तोळ्याचे तीन सोन्याचे सर, दोन ग्रॅमची सोन्याची नथ, प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, प्रत्येकी एक ग्रॅमच्या दोन सोन्याच्या कानातील बाळ्या, एक पाऊण तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, एक तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र असे एकूण साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये रोख रक्कम होती. वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम ठेवलेली लोखंडी पेटी ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करत आहेत.
सकाळी नगरवरून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वानाने पानेगाव रोडपर्यंत माग काढला. दागिन्यांची पेटी चोरट्यांनी पानेगाव रोडच्या कडेला टाकून दिल्याचे दिसून आले. दरम्यान पोलिसांनी गावातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.