Thursday, May 2, 2024
Homeनगरचिलेखनवाडी ते सौंदाळ्यापर्यंतच्या नेवासा-शेवगाव रस्त्याची झाली चाळण

चिलेखनवाडी ते सौंदाळ्यापर्यंतच्या नेवासा-शेवगाव रस्त्याची झाली चाळण

कुकाणा |वार्ताहर| Kukana

नेवासा – शेवगाव या मार्गावरील चिलेखनवाडी-कुकाणा-भेंडा-सौंदाळा या रस्त्यावर ठिकठिकाणी चार ते पाच फूट रुंदीचे

- Advertisement -

मोठमोठे खड्डे झाल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे या रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्याने हा रस्ता की मृत्यूचा सापळा? असा सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे.

नेवासा तालुक्यातील कुकाणा हे मोठ्या बाजारपेठेचे गाव असून याठिकाणी सुमारे वीस ते पंचवीस गावातील नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते मात्र या ठिकाणी अद्ययावत बसस्थानक नाही. रस्त्यावरच प्रवाशांना ताटकळत एस.टी बसची वाट पहावी लागते. त्यातच या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करून हे खड्डे चुकवावे लागतात.

यामुळे दुचाकी वाहनांचे अनेकवेळा किरकोळ अपघातही होतात. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. खड्ड्यात पाणी साचले आहे. यामुळे वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे किरकोळ आपघाताचे प्रमाण वाढत आहे.

याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. फेब्रुवारी- मार्च महिन्यात या रस्त्यावरील खड्डे बुजविले होते. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने ही ठिगळे एकाच महिन्यात उखडली गेली व आता या खड्ड्यांचा आकार पूर्वीपेक्षा मोठा झाला आहे.

कुकाणा ते चिलेखनवाडी हे अवघे दोन कि.मी. चे अंतर आहे पण या रस्त्यावर सर्वत्र खड्डे झाले व साईडपट्ट्यांचीही दुरवस्था झाल्याने रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. तर कुकाणा, भेंडा, सौंदाळा, नेवासा या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे.

येथील बसथांबा परिसरापासून निघालेले वाहन पुढील थांबा येईपर्यंत सुस्थितीत जाईल की नाही याची भीती प्रवाशांना वाटत असल्याने प्रवाशी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कुकाणा माध्यमिक विद्यालयासमोर असलेल्या गतिरोधकाजवळ रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे.

हा खड्डा मोठ्या अपघाताला कारणही ठरू शकतो. हे ठिकाणही अपघातास धोक्याचे आहे. या रस्त्यावरील हे खड्डे म्हणजे प्रवाशांची डोकेदुखी ठरत आहे. तर कुकाणा व परिसरातील ग्रामस्थ प्रवासी व वाहनचालकांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी हा रस्ता त्वरीत दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

नेवासा-शेवगाव हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग असून हा मार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहेच परंतु कुकाणा येथे या रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे झालेले आहेत. याठिकाणी रोज किरकोळ अपघात घडतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती व्हावी.

– श्रीधर कासार अध्यक्ष, नेवासा तालुका कासार संघटना

- Advertisment -

ताज्या बातम्या