नेवासा तालुका वार्तापत्र | सुखदेव फुलारी
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नेवासा तालुक्यातील सर्व गावांमध्ये सर्वदूर हजेरी लावल्याने शेतीच्या मशागतीला वेग आला असून यंदाच्या खरीप हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याचे दृष्टीने शेतकरी व तालुका कृषी विभाग सज्ज झाला असल्याचे चित्र आहे. नेवासा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने आणि त्याला लागुनच मान्सूनचे वेळेपूर्वी आगमन होण्याचे चिन्ह निर्माण झाल्याने शेतकर्यांनी खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. ट्रॅक्टर व बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीपूर्व मशागती केल्या जात आहेत.
2025-26 च्या खरीप हंगामात बाजरी, मका, तूर, मूग, सोयाबीन, भुईमुग, कपाशी अशा विविध खरीप पिकांची एकूण 54 हजार 905 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यासाठी विभागाकडून आवश्यक खतसाठा, बियाणे, आणि कृषी निविष्ठांच्या वितरणाचे बारकाईने नियोजन करण्यात आले आहे.
2024-25 व 2025-26 चा तुलनात्मक खरीप हंगाम
नेवासा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडील उपलब्ध माहिती नुसार नेवासा तालुक्यात मागील 2024-25 च्या खरीप हंगामात 55 हजार 361 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यात बाजरी 2,299 हेक्टर, मका 1,651 हेक्टर, तूर 6,044 हेक्टर, मूग 676 हेक्टर, सोयाबीन 10,967 हेक्टर, भुईमूग 34 हेक्टर, कापूस 33,690 हेक्टर क्षेत्राचा समावेश होता.
तर यावर्षी 2025-26 च्या खरीप हंगामात एकूण 54,905 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात बाजरी 2200 हेक्टर, मका 1750 हेक्टर, तूर 6,500 हेक्टर, मूग 400 हेक्टर, सोयाबीन 10,500 हेक्टर, भुईमूग 55 हेक्टर, कापूस 33,500 हेक्टर क्षेत्राचा समावेश असणार आहे.
पिक उत्पादन व उत्पादकता
नेवासा तालुक्यात 2024-25 खरीप हंगामाच्या तुलनेत 2025-26 च्या हंगामाची पिक उत्पादन व उत्पादकता वाढण्याचा अंदाज आहे. खरीप हंगाम 2024-25 मध्ये 2299 हेक्टर क्षेत्रात बाजरीचे 3477.67 मे. टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 1512.69 किलो), 1651 क्षेत्रात मक्याचे 156.84 मे. टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 95 किलो), 6044 हेक्टर क्षेत्रात तुरीचे 5664.13 मे. टन उत्पादन मिळाले(उत्पादकता 936.25 किलो), 676 हेक्टर क्षेत्रात मुगाचे 229.94 मे. टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 340 किलो), 34 एकर क्षेत्रात भूईमुगाचे 44.18 मे.टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 1299.52 किलो), 10967 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे 23,158.68 मे. टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 2111.67 किलो), 33690 हेक्टर क्षेत्रात कापसाचे 37413.75 मे. टन उत्पादन मिळाले (उत्पादकता 110.53 किलो).
या तुलनेत यावर्षी 2025-26 च्या खरीप हंगामात 2200 हेक्टर क्षेत्रात बाजरीचे 3660.71 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 1663.96 किलो), 1750 क्षेत्रात मक्याचे 182.87 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 104.50 किलो), 6500 हेक्टर क्षेत्रात तुरीचे 6700.62 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 1030.87 किलो), 400 हेक्टर क्षेत्रात मुगाचे 194.70 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 374 किलो), 55 एकर क्षेत्रात भूईमुगाचे 78.62 मे.टन (उत्पादकता 1429.47 किलो) उत्पादन मिळेल.
10500 हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचे 24389.78 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 2322.84 किलो), 33500 हेक्टर क्षेत्रात कापसाचे 40923.03 मे. टन उत्पादन मिळेल (उत्पादकता 1221.58 किलो) या प्रमाणे उत्पादन व उत्पादकता मिळेल असे अपेक्षित आहे.
रासायनिक खत उपलब्धता
नेवासा तालुका कृषी विभागाने खरीप हंगाम 2025-26 करिता 27 हजार 649 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली असून, त्यापैकी 21 हजार 282 मेट्रिक टन खते तालुक्यासाठी मंजूर झालेले आहे. तालुक्यात 1 एप्रिल 2025 रोजी युरिया 2393.47 मे. टन, डीएपी 676.20 मे. टन, एमओपी 1024.97 मे. टन, संयुक्त खते 5016.88 मे. टन आणि एसएसपी 1885 मे.टन साठा शिल्लक होता. खरीप हंगाम 2025 करिता संरक्षित साठयांचे नियोजन लक्षांक 463 मे. टन तर साध्य 148 मे. टनाचे आहे.
तालुक्यातील नियोजित पेरणी क्षेत्र व उपलब्ध बियाणे…
बाजरी 220 हेक्टर (उपलब्ध बियाणे 77 क्विंटल), मका 1750 हेक्टर (उपलब्ध बियाणे 262.50 क्विंटल), तूर 6500 हेक्टर (उपलब्ध बियाणे 500.50 क्विंटल), मूग 400 हेक्टर (उपलब्ध बियाणे 13.20 क्विंटल), सोयाबीन 10,500 हेक्टर (उपलब्ध बियाणे 2756.25 क्विंटल), भुईमुग 55 हेक्टर (उपलब्ध बियाणे 33 क्विंटल), कापूस 34500 हेक्टर (उपलब्ध बियाणे 1 लाख 67 हजार 500 पाकिटे).
बियाण्यांच्या बाबततही परवानाधारक विक्रेत्यांकडून पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. शेतकर्यांनी फसवणूक टाळण्यासाठी फक्त परवानाधारक कृषी केंद्रांवरूनच बियाणे, खते व औषधे खरेदी करावीत, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.
निविष्ठा खरेदी करताना पक्के बिल घ्या
तालुक्यामध्ये आवश्यक सर्व खते व बियाणांचा साठा उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी निविष्ठा खरेदी करतेवेळी कृषी सेवा केंद्राकडून पक्के बिल घ्यावे. सोयाबीन पेरणी करताना उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया करणेत यावी. निविष्ठांविषयी कोणतीही तक्रार असल्यास तालुकास्तरीय भरारी पथक अथवा कृषी विभागाच्या 1800 233 4000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.
– धनंजय हिरवे, नेवासा तालुका कृषी अधिकारी





