Monday, May 6, 2024
Homeनाशिकनिफाड नगरपंचायत : काकांना अण्णा वरचढ, सेनेच्या जागा वाढल्या, राष्ट्रवादी जिथल्या तिथेच...

निफाड नगरपंचायत : काकांना अण्णा वरचढ, सेनेच्या जागा वाढल्या, राष्ट्रवादी जिथल्या तिथेच…

निफाड । आनंद जाधव

निफाड नगरपंचायतीच्या दुसर्‍या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना, शहर विकास आघाडी, काँग्रेस, बसपा या एकत्रित गटबंधनाने निफाड नगरपंंचायतीवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा घेत आपले संख्याबळ कायम ठेवले असून बसपा, काँग्रेस व अपक्ष यांनीही एका जागेवर बहुमत मिळविले असून शिवसेनेने सर्वाधिक 7 जागा जिंकत आपले संख्याबळ वाढविले आहे. प्रचाराचे योग्य नियोजन अन् अनिल कुंदेंना राजाराम शेलार, आसिफ पठाण, मधूकर शेलार यांची मिळालेली साथ यामुळे विजयाचा मार्ग सुकर होण्यास मदत झाली आहे….

- Advertisement -

निफाड नगरपंचायतीत मागील पंचवार्षिक निवडणुकीवर एक नजर टाकली असता शिवसेना 5, भाजप 5, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 1, बसपा 1, अपक्ष 2 असे पक्षीय बलाबल होते. त्यावेळी अनिल कुंदे राष्ट्रवादीत होते. तर राजाराम शेलार भाजपात व मुकूंद होळकर, संजय कुंदे शिवसेनेत होते. पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

अनिल कुंदे शिवसेनेत गेले तर किरण कापसे, जावेद शेख यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर राजाराम शेलार यांनी सवता मुभा निर्माण केला. भाजपचे शंकर वाघ यांनी स्वतंत्र पॅनल केले. परिणामी शहर विकास आघाडी, शिवसेना, बसपा, काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढविली तर राष्ट्रवादी व भाजपने स्वतंत्र चुल मांडली.

त्यातही राष्ट्रवादीचे एकाच घरातील उमेद्वार दोन दोन प्रभागात उभे राहिल्याने हातातील जागा गमावण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली तर राष्ट्रवादीचे दिलीप कापसे यांचा अल्प मतांनी झालेला पराभव पक्ष व कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.

तसेच शिवसेनेचे संजय कुंदे यांचा झालेला धक्कादायक पराभव शिवसेनेला आत्मपरिक्षण करणारा ठरला आहे. प्रचारासाठीं शिवसेनेचे अनिल कुंदे, राजाराम शेलार यांनी केलेले नियोजन व घेतलेली मेहनत विजयासाठी कामी आली.

या निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांपैकी अनिल कुंदे, किरण कापसे, जावेद शेख हे पुन्हा विजयी झाले तर उपनगराध्यक्षा स्वाती गाजरे, लक्ष्मी पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला. वैनतेय विद्यालयाचे शिक्षक तथा माजी जि.प. सदस्य साहेबराव बर्डे यांचा प्रथमच नगरपंचायतीत प्रवेश झाला.

तसेच सर्वांशी जुळवून घेणारे शिवाजी ढेपले यांचे चिरंजिव किशोर ढेपले व पल्लवी जंगम यांचा मोठ्या फरकाने झालेला विजय यश अधोरेखित करणारा ठरला आहे. येथे अनेक उमेद्वारांना अति आत्मविश्वास देखील नडला असून अनेक उमेद्वार हे निवडण्यापेक्षा इतरांना पाडण्यासाठी उभे केल्याने यात अनेकांचे मनसुबे यशस्वी झाल्याचे दिसले. तर मागील वेळेस पराभवाचा सामना करावा लागल्याने नंदू कापसे, संदिप जेऊघाले, विक्रम रंधवे यांनी या निवडणुकीत पराभवाची परतफेड करीत नगरपंचायतीत प्रवेश केला आहे.

एकूणच नगरपंचायतीच्या निकालावर एक दृष्टीक्षेप टाकला असता समाज, नातेवाईक, जनसंपर्क या मुद्यालाच मतदारांनी पसंती दिल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत हार, जित होत असते. त्यामुळे ‘झाले गेले गंंगेला मिळाले’ हा न्याय लावत सर्वांनी हातात हात घालून शहराच्या विकासाला प्राधान्य द्यावे एवढीच अपेक्षा.

- Advertisment -

ताज्या बातम्या