Monday, May 6, 2024
Homeनाशिकनिफाड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा विरोधकांना 'हा' इशारा

निफाड नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा विरोधकांना ‘हा’ इशारा

निफाड । प्रतिनिधी Niphad

माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका रूपाली रंधवे यांनी नगरपालिका प्रशासनावर केलेले आरोप धादांत खोटे असून सदर आरोप प्रजासत्ताक दिनापर्यंत सिद्ध करावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात आम्ही सर्व पदाधिकारी बेमुदत उपोषण करू, असा इशारा नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे व आरोग्य, शिक्षण व स्वच्छता सभापती साहेबराव बर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

- Advertisement -

निफाडच्या माजी नगराध्यक्ष तथा नगरसेविका रूपाली रंधवे यांनी नगरपालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना बुधवारी (दि.28) निवेदन दिले. त्यानंतर गुरुवारी नगराध्यक्ष कांताबाई कर्डिले, उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, सभापती साहेबराव बर्डे यांनी नगसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले.

उपनगराध्यक्ष अनिल कुंदे म्हणाले, कचरा डेपोसाठी 20 सप्टेंबर 2019 ला तांत्रिक मान्यता घेण्यात आली. त्यावेळी दिवसभरात होणार्‍या खर्चानुसार वाहनांचे नियोजन करण्यात आले. दिवसाचा एकूण खर्च 43,279 रुपये तर वर्षभरात 1 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कचरा गाड्या नगरपालिकेच्या असून सदर गाड्या ठेकेदाराला भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पूर्वी नगरपालिका फंडातून होणारा खर्च आता 14व्या वित्त आयोगातून होत आहे. असे असताना दर महिना 11 ते 12 लाख रुपये लाटले जात असल्याच्या विरोधकांच्या आरोपात तीळमात्रदेखील तथ्य नाही.

वेळेवर घंटागाडी येत नसेल तर कचरा दिसत का नाही, असा प्रश्नही अनिल कुंदे यांनी उपस्थित केला. तर राजू ढेपले कचरा डेपोजवळ राहत नाही. त्या ठिकाणी त्यांचे केवळ शेड आहे. असे असताना त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कचरा गाड्या खराब झाल्या तरी पर्यायी गाड्या उपलब्ध करून द्याव्या लागतात. नागरिकांची तक्रार असल्यास तत्काळ अंमलबजावणी केली जाते. विरोधकांच्या आरोपांवर आम्ही काहीच बोललो नाही तर खोटी गोष्टही खरी वाटायला लागते. त्यामुळे या विषयावर खुलासा करत असल्याचे सांगत निफाड शहर विकास आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने लवकरच विकास आराखडा तयार केला जाईल, असे अनिल कुंदे यांनी नमूद केले. यावेळी नगरसेवक संदीप जेऊघाले, किशोर ढेपले, सविता धारराव, संदीप शिंदे, सुनीता कापसे, अलका निकम, सविता तातेड, माजी नगरसेवक देवदत्त कापसे, आसिफ पठाण आदी उपस्थित होते.

तक्रार नसताना पोटदुखी का?

घंटागाडीच्या प्रत्येक वाहनाला जीपीएस आहे. त्यामुळे गाड्या फिरत नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. तसेच कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीत पगार बिले काढली जात असतील तर तपासणी करावी. एका कर्मचार्‍याचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र तो निकाली निघाला आहे. याबाबत कोणाचीही तक्रार नसताना पोट दुखण्याचे कारण काय? तसे असेल तर आम्हालाही संबंधितांच्या विनापरवाना बांधकामांवर आता लक्ष द्यावे लागेल, असा इशारा कुंदे यांनी दिला.

अनागोंदीचा प्रश्नच नाही : बर्डे

निफाड शहरात 95 टक्के भूमिगत गटारी आहेत. कचरा डेपोशेजारी लोकवस्ती नाही. ठेकेदाराला ट्रॅक्टर भाड्याने देणे यात नगरपालिकेचा फायदा आहे. दररोज शहरात स्वच्छता होते. कचरा डेपोचा ठेका देण्यासाठी ऑनलाईन निविदा दाखल केली जाते. त्यामुळे अनागोंदीचा प्रश्नच नाही, असे साहेबराव बर्डे यांनी स्पष्ट केले.

तेव्हा गप्प का?

नगरपालिका प्रशासनावर आरोप करणारे नगराध्यक्षपदावर असतानाही हीच बिले निघत होती. मग तेव्हा विरोधक गप्प का होते, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. खोट्या सह्यांच्या प्रश्नावर बोलताना कुंदे म्हणाले, आपल्याच घरातील सदस्यांच्या सह्या असताना सह्या खोट्या कशा असू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या