मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीच्या निकालांनी केवळ मुंबईच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (महायुती) एकत्रितपणे ११८ जागा जिंकत बहुमताचा आकडा (११४) पार केला आहे. या विजयामुळे मुंबईवर भाजपचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी, यावरून सुरू झालेली राजकीय चिखलफेक आता टोकला पोहोचली आहे.
निवडणुकीच्या निकालांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दारी’चा आरोप केला आहे. राऊत म्हणाले की, “जर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती, तर भाजपला मुंबईतील महापौरपद मिळवणे अशक्य होते.” त्यांनी शिंदेंची तुलना ऐतिहासिक ‘जयचंद’शी करत मराठी जनता हा विश्वासघात कधीही विसरणार नाही, असा घणाघात केला. विशेष म्हणजे, राऊत यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना थेट टॅग करत हे आव्हान दिले.
संजय राऊत यांच्या या टीकेला भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांच्या ‘जयचंद’ टिप्पणीला उत्तर देताना दुबे यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “संजय राऊत हे ‘नारद मुनी’ आणि ‘मंथरा’ या पात्रांचे मिश्रण आहेत.” राऊत हे सातत्याने पक्षात आणि राजकारणात कलह निर्माण करण्याचे काम करत असल्याचा टोला दुबे यांनी लगावला. या विधानामुळे भाजप आणि ठाकरे गटातील संघर्ष आता दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून दोन्ही गटांत विस्तवही जात नाहीये. ठाकरे गटाने सातत्याने शिंदे गटाचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला आहे. मात्र, यंदाच्या बीएमसी निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ११८ जागांनी ठाकरे गटाच्या २५ वर्षांच्या सत्तेला मोठा तडा दिला आहे. मुंबईच्या या सत्तेच्या संघर्षात आता वैयक्तिक टीका-टिप्पणीने खालची पातळी गाठल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.




