बीड । Beed
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्यांमधील वाद चिघळला आहे. बीड येथे रविवारी झालेल्या सभेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणावरून सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या वादात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी जरांगे पाटील यांना थेट इशारा देताना म्हटले, “ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर करतो, त्यांनी नेहमीच सर्वांचा सन्मान केला. खऱ्या मराठ्याने कधीही कुणाच्या आई-बहिणींविषयी अपशब्द वापरले नाहीत. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई लढावी, पण फडणवीस यांच्या आईबद्दल अपमानजनक बोलण्याची हिंमत केल्यास त्यांना कडक प्रत्युत्तर मिळेल.” राणे यांच्या या वक्तव्यातून 96 कुळी मराठ्यांचा राग व्यक्त झाला आहे.
दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी या आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले की, त्यांनी फडणवीस यांच्या आईबद्दल कोणतेही वक्तव्य केले नाही. “मी त्यांच्या आईबद्दल कधीच बोललो नाही. पण बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द निघाले असतील, तर मी ते मागे घेतो,” असे जरांगे यांनी सांगितले. मात्र, त्यांनी याचवेळी फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले, “मराठा समाजाला आरक्षण द्या. ज्या पोलिसांनी आमच्या आंदोलनादरम्यान मराठ्यांच्या आई-बहिणींवर हात उगारला, त्यांना शिक्षा करण्याऐवजी मोठी पदे दिली. तुमच्या आईप्रमाणेच आमच्या मायाही आम्हाला प्रिय आहेत. मराठ्यांना आरक्षण दिल्यास तुमच्या आईची पूजा करू.”
या वादामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या तयारीने राजकीय वातावरण तापले असून, त्यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजप नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रियांमुळे हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठा समाज आणि सरकार यांच्यातील हा तणाव कसा निवळणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे.




