मुंबई । Mumbai
प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळं मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. दरम्यान देसाई यांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर तेथील स्थानिक आमदार महेश बालदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (nitin chandrakant desai)
उरण खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी म्हणाले की, नितीन देसाई मोठा माणूस होता. मोठा कलाकार होता. त्यांचा एन. डी स्टुडिओ आर्थिक विवंचनेत होता हे जगजाहीर आहे. त्यामळे त्यांच्या आत्महत्येला आर्थिक कारण आहे असं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. दीड महिन्यांपूर्वीच त्यांच्याशी भेट झाली होती. पुढे चांगले दिवस येतील. दोन चार चित्रपट चालू होणार आहेत असे ते अपेक्षित होते, असंही बालदी यांनी पुढे सांगितलं. ते म्हणाले की, नितीन देसाईंनी स्थानिकांनाच काम दिलंय, त्यामुळे एनडी स्डुडिओमध्ये स्थानिक मुलंच कामाला होते.
नितीन देसाई यांनी हिंदी, मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शक म्हणून काम केलेलं आहे. नितीन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शकही होते. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध जेजे कला महाविद्यालयातून प्रकाशचित्रणाचं शिक्षण घेतलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटसृष्टीत कारकिर्द सुरू केली आहे. मुंबईजवळील कर्जतमध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओ सुरू केला होता.