अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा समितीचे सदस्य पुंडलीक महाराज थेटे (रा. गिरनारी, जि. नाशिक) यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून एक लाख रूपये खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘तुम्हाला आमचे राज ठाकरे साहेबांची अॅलर्जी आहे काय, तुम्हाला नगरमधील मनसेचे कार्यकर्ते काळे फासतील’ असा दमही त्या व्यक्तीने दिला आहे.
मंगळवारी दुपारी दिंडी शेंडी (ता. नगर) येथील दत्त मंदिरात आली असता सदरची घटना घडली असून याप्रकरणी थेटे महाराज यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका मोबाईल नंबरधारक अनोळखी व्यक्तीविरूध्द धमकी, खंडणीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला असून तो तपासकामी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे. त्र्यंबकेश्वर येथून 20 जून रोजी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. या दिंडीत थेटे महाराज सहभागी झाले आहेत. दिंडी मंगळवारी (2 जुलै) दुपारी नगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील शेंडी येथील दत्त मंदिरात थांबली होती.
त्यावेळी थेटे महाराज यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल नंबरवरून मिसकॉल आला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून त्यांना फोन आला असता त्यांनी तो उचलला. तेव्हा समोरचा व्यक्ती म्हणाला,‘तुम्हाला आमचे राज ठाकरे साहेबांची अॅलर्जी आहे काय, तुम्ही सध्या कोठे आहात, तुमचे लोकेशन कोठे आहे. तुमच्या तोंडाला अहमदनगर मधील मनसेचे कार्यकर्ते काळे फासतील’ असा दम दिला. तसेच ‘तुला हे संकट टाळायचे असेल तर मला एक लाख रूपये दे नाहीतर तुला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली. दरम्यान त्याच व्यक्तीने पुन्हा फोन करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिंडी नगर शहरात आल्यानंतर थेटे महाराज यांनी बुधवारी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून एमआयडीसी हद्दीत गुन्हा घडला असल्याने तो तपासकामी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.